काश्मीरमधील फुटीरतावादी पाकिस्तानमधून हवाला मार्गाने येणारे पैसे वापरून खोऱ्यातील शाळांवर हल्ले आणि दगडफेक घडवून आणतात, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांना आर्थिक रसद (टेरर फंडिंग) पुरवल्याप्रकरणी ७ फुटीरतावादी नेत्यांना सोमवारी एनआयएने ताब्यात घेतले होते. या सगळ्यांविरोधात ठोस पुरावे सापडल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हवालामार्गे मिळालेल्या पैशांचा वापर करून काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यात हुर्रियत नेत्यांचा सहभाग आढळून आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

फारूक अहमद दार उर्फे बिट्टा कराटे, नईम खान, शाहिद-उल-इस्लाम, अल्ताफ फंटूस, मेहराजुद्दीन, अयाज अकबर आणि पीर सैफुल्ला या फुटीरतावादी नेत्यांना एनआयएने काल अटक केली होती. बिट्टा कराटेला दिल्लीतून तर उर्वरित सर्वांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली. चौकशीसाठी सर्वांना दिल्लीला आणण्यात आले होते. एका वृत्त वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हुरियत नेता नईम खान यांनी हवालाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे महटले होते. या खुलाशानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली होती. मे महिन्यात एनआयएने या प्रकरणी अनेक फुटीरतावादी नेत्यांची चौकशी केली होती. एनआयएच्या एका पथकाने तहरीक-ए-हुरियतचा फारूक अहमद दार उर्फ बिट्टा कराटे आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाझीची सलग ४ दिवस चौकशी केली होती. त्यानंतर या दोघांच्या बँक खात्यांच्या माहितीसह आणि मालमत्तेच्या कागदपत्रांसह दिल्लीला बोलावले होते.

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी खोऱ्यातील शाळा आणि इतर सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचला होता, अशी माहिती एनआयएला मिळाला होती. गतवर्षी ८ जुलै रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या गोळीबारात हिजबुलचा कमांडर बुरहान वानी ठार झाला होता. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात काश्मीर खोऱ्यातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते.