भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील पहिल्याच जाहीर सभेवेळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या सहा झाली आहे. या स्फोटामध्ये ८३ जण जखमी झाले आहेत. पाटण्यातील गांधी मैदानावर आयोजित या सभेत क्रूडबॉम्बचे सहा स्फोट झाले होते.
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या मुद्दय़ावरून बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यात जूनमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर संयुक्त जनता दल व केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार यांच्यातील जवळीक वाढली. या सर्व पाश्र्वभूमीवर पाटण्यात प्रथमच भाजपतर्फे आयोजित ‘हुंकार रॅली’त नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार होती. मात्र, या सभेला काही तास शिल्लक असतानाच पाटणा रेल्वेस्थानकातील प्रसाधनगृहात क्रूडबॉम्बचा स्फोट झाला.
स्फोटाच्या वृत्तानंतरही मोदींच्या सभेसाठी गांधी मैदानावर खच्चून गर्दी जमा झाली होती. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच मैदानाच्या डावीकडील भागात बॉम्बस्फोटांची मालिका सुरू झाली. मात्र, त्यानंतरही मोदींनी सभेला उपस्थित जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन करत भाषण सुरूच ठेवले. मोदींच्या भाषणानंतर मैदान तातडीने रिकामे करण्यात आले. मैदानाची कसून तपासणी केली असता तिथे आणखी दोन क्रूडबॉम्ब आढळले.
नितीशकुमारांचा दौरा रद्द
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बॉम्बस्फोटाचे वृत्त समजताच मुंगेर दौरा रद्द करत तातडीने उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारनेही तातडीने हालचाली करत राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक घटनास्थळी रवाना केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधून स्फोटामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करण्याचे आदेश दिले, तसेच लोकांनी शांत राहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पूर्वनियोजित कट
‘हुंकार रॅली’च्या सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करण्यात आला नव्हता. हा संपूर्ण प्रकारच संशायस्पद असून बॉम्बस्फोट हा पूर्वनियोजित कट असावा अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. पोलीस व तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींचा छडा लावतील, असेही नितीश यांनी स्पष्ट केले.

नितीशकुमार विश्वासघातकी
पाटण्यातील सभेत नरेंद्र मोदींनी नितीशकुमार यांच्यावर टीकेची तोफ डागली. नितीशकुमार हे संधिसाधू व विश्वासघातकी असून पंतप्रधान होण्याची घाई झाल्याने त्यांनी राममनोहर लोहिया यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे, असा घणाघाती आरोप मोदी यांनी केला. मोदी म्हणाले, ‘बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मी नेहमीच मित्र असा करीत असल्याने तुमच्या मित्राने बिहारमध्ये भाजपला सोडचिठ्ठी का दिली, असा प्रश्न काही जण विचारतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, ज्या व्यक्तीने राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या तत्त्वांना सोडले तो भाजपला सहज सोडू शकतो. लोहिया आणि जयप्रकाश यांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला व देशातून काँग्रेसचे उच्चाटन व्हावे, यासाठी लढा दिला. बिहारचे मुख्यमंत्री स्वत:ला या दोघांचे अनुयायी समजतात, मात्र आज तेच पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेससोबत लपंडाव खेळत आहेत. या गुन्ह्य़ासाठी लोहिया व जयप्रकाश यांचे आत्मे त्यांना कधीही माफ करणार नाहीत’.

स्फोटांच्या या घटनेमुळे अतीव दुख झाले आहे. या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे. घटनेतील मृतांना श्रद्धांजली. जखमींसाठी प्रार्थना करतो.
नरेंद्र मोदी

संयुक्त जनता दलाने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतरच अशा घटना घडू लागल्या आहेत. यात काहीतरी काळेबेरे आहे. 
साबीर अली, जेडीयू

हा दहशतवादी हल्ला होता की राजकीय कटकारस्थान, या विषयी आताच काही ठोस सांगता येणार नाही.
आर. पी. एन. सिंह, केंद्रीय गृह राज्यमंत्री