म्यानमार आणि भूतानशी लागून असलेल्या भारताच्या सीमाभागात सुरक्षेची परिस्थिती अतिशय गंभीर असून, या ठिकाणी घुसखोरीसह शस्त्रे व अमली पदार्थ यांची तस्करी होत आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले. या आंतरराष्ट्रीय सीमांचे परिणामकारक व्यवस्थापन करण्यासाठी आपले मंत्रालय उपाययोजना करत असल्याचे ते म्हणाले.

भारत-म्यानमार सीमेच्या १० किलोमीटर परिसरातील २४० खेडय़ांमध्ये राहणारे दोन लाखांहून अधिक लोक कुठल्याही संरक्षण कवचाशिवाय घुसखोरांच्या दयेवर राहतात, असे राजनाथ यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सुरक्षा परिषदेत सांगितले. भूतान सीमेवरही अशीच परिस्थिती असून, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती परिणामकारकरीत्या हाताळण्यासाठी संयुक्त गुप्तचर समितीचे (जेआयसी) अध्यक्ष आर. एन. रवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या समितीचा अहवाल हाती येण्याची अपेक्षा असून त्यानुसार सरकार कार्यवाही करेल, अशी माहिती राजनाथ यांनी दिली. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी याकरता सीमा भागात पोलीस ठाणी स्थापन करण्याची, तसेच असलेली बळकट करण्याची सूचना करताना, केंद्राच्या ‘अ‍ॅक्ट- ईस्ट’ धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. सीमेवर कुंपण उभारण्याचे काम जेथे-जेथे प्रलंबित आहे, तेथे तातडीने भूसंपादन करून कुंपणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सीमेपलीकडून तस्करीच्या मार्गाने येणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रांचा मोठा साठा या भागात असून त्यामुळे गुन्ह्य़ांना प्रोत्साहन मिळेल, तसेच सुरक्षाविषयक स्थिती बिघडेल. त्यामुळे अशा बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध मोहीम उघडून संबंधित मुख्यमंत्र्यांनी आपली राज्ये शस्त्रमुक्त करावीत, असेही ते म्हणाले.