07 July 2020

News Flash

गंभीर आजार असल्यास, श्रमिक रेल्वेचा वापर नको!

प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे मंत्रालयाची सूचना

संग्रहित छायाचित्र

स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या श्रमिक रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या मृत्यूनंतर, शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाने नवी सूचना जाहीर केली. गंभीर आजार असलेल्या लोकांनी श्रमिक रेल्वेंमधून प्रवास करणे टाळावे, असे रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रमिक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची रेल्वे मंत्रालयाला दखल घ्यावी लागली. मात्र हे मृत्यू गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे. आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्ती श्रमिक रेल्वेंमधून प्रवास करत असल्याचे आढळले आहे. करोनाच्या महासाथीमुळे त्यांच्या प्रकृतीला आणखी धोका होण्याची शक्यता आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षांपेक्षा कमी वयाची बालके, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध यांनी श्रमिक रेल्वेंतून प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल तरच करावा, असे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. हीच सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारेही शुक्रवारी दिली. रेल्वे आपल्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असेही गोयल यांनी म्हटेल आहे.

फक्त ४ रेल्वेंचा ७२ तास प्रवास

श्रमिक रेल्वेंना ठरलेल्या स्थानकांवर पोहोचण्यासाठी कित्येक तासांचा उशीर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या टिकेला उत्तर देण्यासाठी रेल्वेमंडळाने शुक्रवारी पत्रकार परिषदही घेतली. रेल्वेने आत्तापर्यंत ३८४९ श्रमिक रेल्वे सोडल्या, त्यापैकी फक्त ४ रेल्वेंना गंतव्य स्थानकावर पोहोचण्यासाठी ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. कोणतीही रेल्वे मार्गापासून भरकटली नाही, असा दावा केंद्रीय रेल्वेमंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी केला. रेल्वेगाडीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रमिक रेल्वेगाडी सोडली जाईल, असेही यादव यांनी सांगितले. एकूण स्थलातंरित मजूर प्रवाशांपैकी ४२ टक्के प्रवासी उत्तर प्रदेश तर ३७ टक्के प्रवासी बिहारला परतले आहेत.

आरक्षणाचा कालावधी ३० वरून १२० दिवस

१ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० प्रवासी रेल्वे तसेच, ३० विशेष राजधानी गाडय़ांच्या आरक्षणाचा कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ४ महिनेआधी रेल्वे तिकीट आरक्षित करता येऊ शकेल. ही सुविधा ३१ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 12:10 am

Web Title: seriously ill do not use labor train abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन काळात बाहेर फिरताना थांबवल्याच्या रागातून दिल्लीत इसमाची हत्या
2 प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं करोनामुळे निधन
3 महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका ! भाजपा नेत्याची मागणी
Just Now!
X