दिल्लीत शनिवारी दुसऱ्या फेजचा सिरो सर्वे सुरु झाला. करोना व्हायरस विरुद्धच्या लढयात सिरो सर्वे अत्यंत महत्त्वाचा आहे असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. दिल्लीत करोना रुग्णाची संख्या कमी होत असून परिस्थिती हळूहळू आता सुधारतेय असे सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशावरुन दिल्लीत आजपासून सिरो सर्वे सुरु करत आहोत. जून महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये २४ टक्के दिल्लीकरांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसले होते. या सर्वेमुळे रणनिती ठरवायला सरकारला मदत होते” असे अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून पोस्ट केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- Good News : भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

दिल्लीत दर महिन्यात सिरो सर्वे करणार असे सत्येंद्र जैन यांनी मागच्या महिन्यात जाहीर केले होते. दर महिन्याच्या एक ते पाच तारखेदरम्यान हा सिरो सर्वे करण्यात येईल. मागच्या महिन्यात एनसीडीसीने केलेल्या सिरो सर्वेमधून दिल्लीत २३ टक्के नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली. या सिरो सर्वेमध्ये प्रत्येकाच्या शरीरातील रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. संसर्गाविरोधात लढण्यासाठी शरीरात किती प्रमाणात अँटीबॉडीजची निर्मिती झालीय. ते या चाचणीद्वारे तपासण्यात आले. करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजमुळे रुग्ण त्यातून बरा होतो.

आणखी वाचा- करोनाचा धोका वाढला! जुलैमध्ये भारतात दर तासाला २५ रुग्णांचा मृत्यू

दिल्ली सरकारसोबत मिळून एनसीडीसीने हा सिरो सर्वे केला. २७ जून ते १० जुलै दरम्यान एकूण २१,३८७ रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या सर्वेमधून २३ टक्के नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

आणखी वाचा- करोनाचा उद्रेक! २४ तासांत ५७,११७ रुग्ण, ७६४ जणांचा मृत्यू

दिल्लीची अंदाजित लोकसंख्या १.९ कोटी आहे. सर्वे रिपोर्टनुसार, २३ टक्के म्हणजे आतापर्यंत ४० लाखा पेक्षा जास्तलोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. लॅबमध्ये केलेल्या चाचणीत दिल्लीत आतापर्यंत १.२३ लाख नागरिकांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सिरो सर्वेच्या रिपोर्टमधला आकडा त्यापेक्षा जास्त आहे. सिरो सर्वेमध्ये अनेकांच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले.