सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला असून त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर ’ घोषित करण्यात आले  आहे.

करोनाप्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे. अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून त्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे. सन्मान यादीत चीनचे संशोधक झांग योंगझान यांचाही समावेश असून ते व त्यांच्या चमूने सार्स सीओव्ही २ विषाणूची जनुकीय संकेतावली सर्वप्रथम शोधून काढली. या मानकऱ्यांत चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही समावेश आहे. त्यांनी लसनिर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही यादीत समावेश आहे. या सर्वाचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे.