पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर अर्थात शुक्रवारी देशभरात सुमारे अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या हडपसरमधील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे. १८पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. “लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”, असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. “अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल”, असं देखील पूनावाला म्हणाले.

लस किती सुरक्षित?

दरम्यान, चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले, “ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत. १२ वर्षांच्या खालील मुलांचा देखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुलं सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवावॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल. मात्र, जेव्हा DCGI ला हे करणं योग्य वाटेल, तेव्हाच हे घडू शकेल”.

“…तर आपल्या नावे गोल्ड मेडल आणि नवा विश्वविक्रम असता”, लसीकरणाविषयी आनंद महिंद्रांचं ट्वीट!

९२० जणांवर लसीची चाचणी!

गेल्या वर्षी अमेरिकी लसनिर्मिती कंपनी असलेल्या नोवोवॅक्सने आपल्या लसीच्या उत्पादनासंदर्भात सिरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे. NVX-CoV2373 अर्थात Covovax असं या लसीचं नाव आहे. भारतात चाचण्या घेतली जाणारी ही चौथी लस आहे. २ ते १७ या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण १० ठिकाणांहून ९२० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ ठिकाणं पुण्यातली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serum ceo adar poonawalla confirms covavax vaccine for children in january 2022 pmw
First published on: 18-09-2021 at 16:19 IST