News Flash

करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? वाचा काय म्हणतायत तज्ज्ञ!

करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास काय परिणाम होऊ शकतात?

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात?

देशभरात करोनासाठी Covishield आणि Covaxin या दोन लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, आधी आरोग्य सेवक, त्यानंतर सुरक्षा सेवक आणि ६० वर्षांवरील नागरिक आणि आता ४५ वर्षांवरील सर्वांना अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने करोना लसीकरण केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण आणि त्यानंतरच्या परिणामांविषयी अनेक प्रश्न आणि संभ्रम लोकांच्या मनात आहेत. त्यातला सर्वाधिक ‘चर्चेत’ असलेला प्रश्न म्हणजे करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्याच त्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो का किंवा त्याचे आरोग्यावर काही विपरीत परिणाम होतात का? यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबतच काही तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते…

“करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास त्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो, असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही”, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. मात्र, असं जरी असलं, तरी काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते लसीकरणानंतर मद्यपान केल्यास, आणि विशेषत: अती मद्यपान केल्यास, त्याचा परिणाम होऊ शकतो! इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

किमान एक आठवडा तरी मद्यपान नकोच!

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टर किर्ती सबनीस यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश नसला, तरी लस घेतल्यानंतर किमान एक आठवडा तरी मद्यपान टाळायला हवं”, असं सबनीस म्हणाल्या आहेत. याशिवाय, “जर तुम्ही मद्यपान केलंच, तर ते नियंत्रणात असणं आवश्यक आहे. रोज मद्यपान तर टाळायलाच हवं”, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

मद्यपान केल्यास हा होईल तोटा!

दरम्यान, डॉ. किर्ती सबनीस पुढे म्हणतात, “जर मोठ्या प्रमाणावर मद्यपान केलं, तर लसीमुळे होणारे साईड इफेक्ट्स झाकले जाण्याचा धोका आहे. लस घेतल्यानंतर जर तुम्हाला अंगदुखी, त्वचेवर रॅशेस किंवा ताप असा काही त्रास होऊ लागला, तर मद्यपानामुळे तो जाणवणार नाही आणि त्यावर तातडीने उपचारांची आवश्यकता असली, तर ते करता येणार नाहीत”, असं डॉ. किर्ती सबनीस यांनी नमूद केलं आहे.

मद्यपानामुळे प्रतिकारशक्तीही कमी होते!

याशिवाय, “मद्यपानामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील कमी होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सध्याच्या काळात तर हे फारच महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात तर सार्वजनिक ठिकाणी केलं जाणारं मद्यपान टाळायलाच हवं. कारण त्यामुळे तुमचं मास्क, सॅनिटाझर, सोशल डिस्टन्सिंग याकडे दुर्लक्ष होऊ शकतं”, असं डॉ. सबनीस म्हणाल्या आहेत.

पुण्यातील Serum इन्स्टिट्यूटने बनवलेली Covishield व्हॅक्सिन आणि Bharat Biotech ने बनवलेली Covaxin या दोन व्हॅक्सिनला भारतात लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. कोविशिल्ड ही व्हॅक्सिन सिरम इन्स्टिट्युटने Oxford आणि Astrazenca यांच्यासोबत संयुक्तपणे विकसित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 5:38 pm

Web Title: serum covid vaccine covishield is alcohol after vaccine harmful pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 छत्तीसगड – नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद ; दहा जखमी
2 पश्चिम बंगाल – अमित शाहांचा रोड शो झालेल्या ठिकाणी ४१ क्रूड बॉम्ब आढळल्याने खळबळ
3 अभिनेते-दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन
Just Now!
X