देशात करोनाचं संकट घोंगावत असताना लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. देशातील करोना लशी इतर देशांना का दिल्या याबाबत सोशल मीडियावर रान उठवलं आहे. त्यातच सीरम इंस्टीट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोशल मीडियावर पत्रक पोस्ट केलं आहे. भारतीयांच्या वाट्यातील लशी निर्यात केल्या नाहीत असं स्पष्टीकरण अदर पूनावाला यांनी दिलं आहे. तसेच २-३ महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचं पत्रकाद्वारे सांगितलं आहे.

जगातील करोनारुपी संकट मोठं आहे. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी लस खूप मोठं हत्यार आहे. मात्र लस निर्मिती करताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतील असं त्यात नमूद केले आहे.

‘आपल्या देशात जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरु झालं आहे. त्यात फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सर्वात प्रथम करण्यात आलं. मात्र इतर देशातील करोना संकट पाहता आपण त्यांना मदतीचा हात दिला आणि लस निर्यात केली. त्याचीच प्रचिती म्हणून आज इतर देश भारताला मदत करत आहेत. हा करोना व्हायरस देशांच्या सीमेपर्यंत मर्यादीत नाही. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होणं गरजेचं आहे. आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्या पाहता दोन ते तीन महिन्यात लसीकरण करणं अशक्य आहे. देशातील लशींची मागणी पाहता आम्ही दिवस रात्र त्यावर मेहनत घेतल आहोत.’, असं त्यांनी आपल्या पत्रकात नमूद केलं आहे.

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय करोना…धक्कादायक आकडेवारी आली समोर

देशात करोनाच्या दुसरी लाट असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासात ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांनी करोनावर मात केली. पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.