करोनासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, आता लसीचा तुटवडा हा नवा चर्चेचा आणि राजकारणाचा विषय ठरला आहे. त्यात आता करोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवू लागल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशिल्ड या करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. “अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशातील करोना लस निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातून करोना लसींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी आत्तापासूनच करोना लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्राकडून मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात करोना लसींची मागणी अजून वाढणार असताना लसींच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब मानली जात आहे.

“शक्य असतं, तर मीच अमेरिकेत आंदोलन केलं असतं”

दरम्यान, अदर पुनावाला यांनी अमेरिका आणि युरोपकडून लवकरात लवकर कच्च्या मालाचा पुरवठा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. “मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील करोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला म्हणाले आहेत.

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. ६ महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, चीनकडून लसीसाठीचा कच्चा माल घेण्याच्या पर्यायाचा सीरम विचार करत नसल्याचं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. चीनकडून येणाऱ्या मालाचा दर्जा आणि पुरवठ्यासंदर्भातले निर्बंध याचा विचार करता तो पर्याय विचारात घेतला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

परदेशातून महाराष्ट्रात लसी आयात करण्याच्या मागणीवर आदित्य ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, “मॅडम…”

महिन्याला १०-११ कोटी डोसचं लक्ष्य!

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी बोलून दाखवला आहे.