दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तूर्त जगभरात थांबविण्यात येत असल्याचे अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने बुधवारी जाहीर केले. त्यानंतर भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने ही लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने याबाबत माहिती न दिल्याने औषध महानियंत्रकांनी ‘सीरम’ला नोटीस बजावली. सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या लसीची चाचणी का थांबवण्यात आली नाही असा सवाल यावेळी करण्यात आला होता. नोटीस मिळाल्यानंतर काही वेळात सीरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. आपल्याला चाचणी थांबवण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचं त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं.

“आम्ही डीजीसीआय”च्या नियमांचं पालन करत आहोत. आम्हाला चाचणी थांबवण्यास सांगण्यात आलं नव्हतं. जर सुरक्षेबाबत डीजीसीआयला कोणतीही चिंता असेल तर आम्ही त्यांच्या आदेशांचं आणि प्रोटोकॉलचं पालन करू,” असं सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलं आहे.

दुष्परिणाम आढळल्यावर निर्णय

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लशीच्या उत्पादनाबाबत सीरम इन्स्टिटय़ूटची अ‍ॅस्ट्राझेन्काशी (ब्रिटिश-स्वीडीश कंपनी) भागीदारी आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेन्काने लशीच्या चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला. या लशीमुळे काय दुष्परिणाम झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, लशीची सुरक्षितता पडताळण्यासाठी तूर्त चाचण्या थांबविण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात येत असताना एखाद्या व्यक्तीवर दुष्परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याची स्वतंत्र समितीद्वारे तपासणी करून सुरक्षेबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांची सुरक्षा आणि लशीच्या उच्च दर्जाबाबत कटिबद्ध असल्याचे अ‍ॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

परवानगी का रद्द करू नये?

दुसरीकडे, ब्रिटनमधील अ‍ॅस्ट्राझेन्का लशीच्या चाचणीतील व्यत्ययाबाबत आम्हाला काहीही भाष्य करायचे नसून, भारतातील ‘कोव्हीशिल्ड’ चाचणीवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने स्पष्ट केले होते. भारतातील चाचण्या विनाव्यत्यय सुरूच राहणार असल्याचा निर्वाळाही सीरमकडून देण्यात आला होता. मात्र, या प्रकरणी भारताचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ला नोटीस बजावली. अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने लशीच्या चाचण्या थांबविल्याची माहिती सीरमने दिलेली नव्हती. त्यामुळे लशीची सुरक्षितता निश्चित होईपर्यंत चाचणीसाठी दिलेली परवानगी रद्द का करू नये, अशी विचारणा या नोटिशीद्वारे करण्यात आली.

कोविशिल्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी

२६ ऑगस्टपासून पुण्याच्या भारती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रीसर्च सेंटरमध्ये सीरमकडून तयार करण्यात येत असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली. त्यानंतर वढू बुद्रुक येथील के ईएम रुग्णालय आणि ससून रुग्णालयात या चाचण्यांचा भाग म्हणून स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. त्याअंतर्गत १०० स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली असून त्याबाबतच्या निरीक्षणांवर आधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, ‘आमच्याकडे लस टोचलेल्या ३४ स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लस टोचल्यानंतर त्यांच्यापैकी कोणावरही दुष्परिणाम दिसलेले नाहीत’, असे भारती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रीसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी सांगितले. के ईएम रुग्णालयाच्या वढू बुद्रुक केंद्राचे डॉ. आशिष जावडेकर म्हणाले, ‘दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल संबंधितांकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, भारतात ज्या स्वयंसेवकांवर लस टोचली, त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम झाल्याची माहिती समोर आलेली नाही.’