ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या करोना उपचार प्रकल्पात पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटचा सहभाग 

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना प्रतिबंधासाठी जी लस विकसित केली आहे, त्याचे उत्पादन पुढील दोन ते तीन आठवडय़ात आम्ही सुरू करू , मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे. सिरमने ऑक्सफर्ड विद्यापीठासह एकूण सात जागतिक संस्थांशी लस उत्पादनासाठी भागीदारी केली आहे.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी सांगितले,की आमचे पथक ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. हिल यांच्यासमवेत काम करीत आहे व पुढील दोन तीन आठवडय़ात आम्ही लसीचे उत्पादन सुरू करणार आहोत. पहिल्या सहा महिन्यात ५० लाख डोस तयार केले जातील. त्यानंतर हे उत्पादन महिन्याला १ कोटी डोस इतके वाढवले जाईल. सीरमने यापूर्वी मलेरियावरील लसीसाठीही ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर सहकार्य केले होते. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत ही लस  बाजारात येईल पण त्यासाठी मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी होणे गरजेचे आहे. पुढील दोन तीन आठवडय़ात आम्ही या लसीच्या चाचण्या भारतात सुरू करणार आहोत. ब्रिटनमध्ये या चाचण्या सप्टेंबर- ऑक्टोबपर्यंत यशस्वी होतील असे गृहीत धरून लसीचे उत्पादन करण्यात येत आहे.

लसीच्या चाचण्या करण्यासाठी परवानगीचे सोपस्कार सुरू आहेत असे सांगून पुनावाला म्हणाले, की सध्याची परिस्थिती पाहता आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. पुणे येथील प्रकल्पात या लसीची निर्मिती केली जाणार असून कोविड १९ लसीच्या निर्मितीसाठी स्वतंत्र इमारत व प्रकल्प सुरू करण्यास दोन-तीन वर्षे लागतील. कंपनीने याआधी असे म्हटले आहे,की कोविड १९ लसीचे पेटंट घेतले जाणार नाही. त्याबाबत विचारले असता पुनावाला यांनी सांगितले की, आम्ही पेटंट घेणार नाही, उलट आम्ही ही लस उत्पादन व विक्रीसाठी केवळ भारतातच नव्हे तर जगात उपलब्ध करून देणार आहोत. कुणीही ही लस विकसित केली तरी पेटंट घेता येणार नाही, तर ती लस व्यावसायिक भागीदारीत स्वामित्व धन घेऊन अनेक उत्पादकांना उपलब्ध केली जाईल.

इंदूरमधील विषाणूबाबत अधिक तपासणी

भोपाळ : इंदूरमध्ये करोना संसर्गाची स्थिती बिकट असून मृत्यू दर देशपातळीपेक्षा अधिक म्हणजे ४.८५ टक्के आहे. पण तेथील करोना विषाणूचा प्रकार जास्त आक्रमक असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असून आता तेथील नमुने हे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे निश्चितीसाठी पाठवण्यात येणार आहेत. इंदूरमध्ये आतापर्यंत ५७ बळी गेले आहेत. देशाच्या इतर भागातील करोना विषाणूपेक्षा येथील विषाणू हा जास्त घातक असल्याचा संशय आहे. महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता ज्योती बिंदाल यांनी पीटीआयला सांगितले की, इंदूर भागातील करोना विषाणू वेगळा व आक्रमक असावा, आम्ही याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेशी चर्चा केली असून त्यांना नमुने पाठवण्यात येणार आहेत. स्कूल ऑफ  एक्सलन्स इन पल्मोनरी मेडिसीन या संस्थेचे संचालक जितेंद्र भार्गव यांनी सांगितले की, आरएनए  वेगळा करून किंवा इतर मार्गानी या विषाणूची तपासणी केली तरच तो एवढा घातक का आहे हे समजणार आहे. पण मृत्यूदर जास्त असला तरी तो हृदयविकार व मधुमेह यासारखे सहआजार असलेल्या रुग्णांमुळे अधिक आहे. करोना विषाणूचे अनेक उपप्रकार असून त्यावर लस शोधणे हे त्यामुळेच एक मोठे आव्हान आहे.