सध्या देशातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. देशात सध्या युद्धपातळीवर करोनावरील लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशात करोनावरील लस विकसित होत असलेल्या ठिकाणांचा दौरा करून माहिती घेतली होती. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईमध्ये मानवी चाचणीदरम्यान कोविशील्डची लस घेतलेल्या एका ४० वर्षीय स्वयंसेवकानं न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची समजण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप केला आहे.
चेन्नईमध्ये कोविशील्डची लस घेतलेल्या एका स्वयंसेवकानं न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची समजण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप करत सिरम इन्स्टीट्यूट आणि अन्य काही जणांना कायदेशीर नोटीस पाठवत त्यांच्याकडून पाच कोटी रूपयांची नुकसान
भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच लसीची चाचणीही थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर सिरम इन्स्टीट्यूटकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि दुर्देवी आहेत. सिरम इन्स्टीट्यूटला त्यांच्या स्वंयसेवकांच्या वैद्यकीय स्थितीबाबत काळजी आहे. लसीची चाचणी स्वयंसेवकाची वैद्यकीय स्थिती यांचा अजिबात संबंध नाही,” असं स्पष्टीकरण सिरम इन्स्टीट्यूटकडून देण्यात आलं. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तसंच स्वयंसेवक करोना लसीच्या चाचणीवर आपल्या वैद्यकीय समस्यांचा खोटा आरोप करत असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
“अशी चुकीची माहिती पसरवण्यामागे काही विशिष्ट हेतू असू शकतो. याविरोधात १०० कोटी रूपयांचा दावा ठोकण्यात येईल असा इशाराही दिला आहे. तसंच सर्व खोट्या आरोपांचा बचावही केला जाईल,” असंही सिरम इन्स्टीट्यूटनं स्पष्ट केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 9:53 pm