पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.
‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.
दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.
आयसीएमआरने गेल्या महिन्यात सीरमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारेच लस लवकरात लवकर उपलब्ध होण्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाऊ शकतो असं म्हटलं होतं. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, सीरमने आधीच चार कोटी डोसची निर्मिची केली आहे.
अधिकृत सूत्रांनुसार, सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, चार वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित करण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील दोन, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे. याआधारे कोविशिल्ड करोनाविरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे इतर लसींचा निकाल अद्याप हाती आला नसताना आणि महामारीचं मोठं ओझं असताना कोविशिल्ड करोनामुळे होणारे मृत्यू आणि लागण कमी करण्यात मदत करु शकतं असंही कंपनीने सांगितल्याचं कळत आहे. सीरमने अर्जात भारताला आत्मनिर्भर करण्यास तसंच पंतप्रधानांचं व्होकल फॉर लोकल आणि मेकिंग इन इंडियाचं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी कटिबद्द असल्याचं म्हटलं आहे. सर्व गोष्टी लक्षात घेता तसंच देश आणि जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचवण्यासााठी लवकरात लवकर लस उपलब्ध होणं गरजेचं असल्याचंही सीरमने म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 8:16 am