करोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सरकारने अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली आहे. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विसिकत केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिटयूट करत आहे. सोमवारी दुपारी आम्हाला भारत सरकारकडून लस खरेदीची ऑर्डर मिळाली. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल असे सीरमच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

आज संध्याकाळपासूनच लसीची डिलिव्हरी पाठवण्यास सुरुवात होईल असे अधिकाऱ्याने सांगितले. सुरुवातीला ६० ठिकाणी कोव्हिशिल्ड लस पाठवण्यात येईल. तिथून अन्य ठिकाणी लसीचे वितरण होईल, असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदीसाठी सुद्धा आरोग्य मंत्रालय लवकरच खरेदी करार करणार आहे. ही स्वदेशी लस आहे. औषध नियंत्रकांनी सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.