News Flash

कंपन्यांमध्ये लस‘कारण’

‘सीरम’ आणि भारत बायटेकमध्ये जुंपण्याची चिन्हे

संपूर्ण देशाला करोना लसीकरणाची प्रतीक्षा असताना आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस उत्पादन कंपन्यांमध्ये ‘लसकारण’ रंगण्याची चिन्हे आहेत.

परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नसतानाही स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीला परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या टीकेला उत्पादक कंपनी भारत बायोटेकने सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे, असे कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.

फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशींवर ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशा शब्दांत टीका करणाऱ्या ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचा नामोल्लेख टाळून ‘कोव्हॅक्सिन’ लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, ‘‘आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते. जर माझे म्हणने चुकीचे असेल तर सांगा, पण काही कंपन्यांनी भारत बायोटेकच्या लशीला पाण्याची उपमा दिली आहे.

भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे, ‘पाण्याइतकी सुरक्षित’ असे विडंबन पुण्यातील सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केले होते.

परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नसताना कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याबद्दल काही तज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्या आहेत, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यांना डॉ. इल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मला एक आठवडा द्या मी तुम्हाला निश्चित आकडेवारी देतो, असेही डॉ. कृष्णा यांनी सांगितले.

‘‘आमच्यावरील टीका अनाठायी आहे. कंपनीकडे लशी विकसित करण्याचा प्रचंड अनुभव आहे, आतापर्यंत १६ लशींचे उत्पादन केले आहे. आमची कंपनी जागतिक आहे, अनअनुभवी असल्याचा आरोप करू नये’’, असे डॉ. इल्ला यांनी स्पष्ट केले. आमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याच्या परिणामकारकतेची आकडेवारी मार्चपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोव्हॅक्सिनच्या चाचण्या भारतातच सुरू आहेत, असे नाही तर ब्रिटनसह जगातील बाराहून अधिक देशांमध्ये आम्ही चाचण्या केल्या आहेत, असे कृष्णा म्हणाले. बहुतेक लोक भारतीय कंपन्यांवर टीका करण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर वेगळ्या मार्गानी गप्पा मारत असतात. असे करणे अयोग्य आहे, आम्हाला ते अपेक्षित नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सर्वात मोठे लसीकरण लवकरच : मोदी

औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम भारतात सुरू होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. सांगितले. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठे लसीकरण भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचा सिंहाचा वाटा आहे.

‘कोव्हिशिल्डची किंमत ४३८ ते ५८४ रुपये’

केंद्र सरकारसाठी कोव्हिशिल्ड लशीच्या तीन ते चार मात्रांची किंमत २१९ ते २९२ रुपये असेल, तर खुल्या बाजारात लशीचे मूल्य ४३८ ते ५८४ असेल लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी सोमवारी सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनेका या कंपनीने विकसित केलेली ही लस सीरम संस्था उत्पादित करीत आहे.

नवकरोनाचे राज्यात आठ तर देशात ३८ रुग्ण

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवकरोनाचा आतापर्यंत भारतातील ३८ जणांना संसर्ग झाल्याची माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या २९ जणांचाही समावेश आहे. ३८ पैकी महाराष्ट्रात आठ रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:39 am

Web Title: serum vs bharat biotech coronavirus vaccine mppg 94
Next Stories
1 तिढा कायम! केंद्राची शेतकरी संघटनांशी शुक्रवारी पुन्हा चर्चा
2 जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच – मोदी
3 ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यास ब्रिटनमध्ये सुरुवात
Just Now!
X