२००२ मध्ये उसळलेल्या गुजरात दंगलीतील सदरपुरा येथील १७ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषींना जामीन मंजूर केला असून, त्यांना जामीन मिळालेल्या कालावधीत सामाजिक कामे करण्याचे आदेश दिले आहेत.

१७ दोषींच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षेतेखाली खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मध्य प्रदेशातील इंदूर आणि जबलपूरमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जामीनाच्या काळात आरोपींच्या दैनंदिनीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला त्यांच्या उपजीविकेसाठी काम शोधण्यासाठी सांगितले आहे. तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणास त्यांच्या वर्तणुकीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील ग्रोधा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका बोगीला आग लावण्यात आली होती. यात काही कारसेवकांचा होरपळून मृत्यु झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. सरदारपुरा गावात झालेल्या दंगलीत ३३ मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात या आरोपींचा समावेश आहे. या दंगलीमध्ये झालेल्या हिंसाचारात १००० लोक मरण पावले होते.