15 September 2019

News Flash

एअर इंडियाचा ‘फर्स्ट क्लास’ निर्णय; विमानांमध्ये सैनिकांना प्राधान्य

एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना प्रथम प्राधान्य

प्रतीकात्मक छायाचित्र

भारताच्या ७१व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही विभागातील जवानांना या निर्णयाचा लाभ मिळेल. काल १५ ऑगस्टपासून देशातील विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. इतर अनेक देशांमध्ये सैनिक असलेल्या प्रवाशांना विमानात चढताना अग्रक्रम देण्याची पद्धत अवलंबिली जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने नवा स्वागतार्ह पायंडा पाडला आहे. ‘एअर इंडिया’चे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

देशासाठी सैनिकांप्रती देशाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितले. त्यानुसार आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये सैनिकांना प्रथम आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाईल. तसेच देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात सैनिकांना सवलत दिली जाईल, असे एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले. मात्र, एअर इंडियाने काही दिवसांपूर्वीच लष्करी अधिकारी-जवानांसाठी तिकिटांमध्ये असलेल्या सवलती ऑनलाइन देणे बंद केले होते. १ ऑगस्टपासून सैनिकांना प्रत्यक्ष एअर इंडियाच्या शहर-बुकिंग कार्यालयात गेल्यासच सवलत मिळते. ज्या शहरात अशी बुकिंग कार्यालये नसतील तेथे विमानतळावरील ‘एअर इंडिया’च्या खिडकीवर ही सवलत उपलब्ध होणार आहे. काही ट्रॅव्हल एजंट्‍सनी या सुविधेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्याने हा बदल करण्यात आला आहे.

First Published on August 16, 2017 11:29 am

Web Title: serving soldiers will now be the first to board air india flights