बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. आसाराम बापूचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून पत्नी आजारी असल्याने आसाराम बापूने न्यायालयात जामीन अर्ज केला होता.

आसाराम बापूची पत्नी लक्ष्मीदेवी यांना काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सध्या अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आसाराम बापूने जोधपूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पत्नीच्या प्रकृतीचे कारण त्याने दिले होते. या अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी आसाराम बापूच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. शेवटी हे प्रकरण उच्च न्यायालयातील दुसऱ्या न्यायाधीशांच्या पीठासमोर सुनावणीसाठी गेले.

गुरुवारी या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने आसाराम बापू याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आसाराम बापूला आणखी काही काळ तुरुंगातच रहावे लागणार आहे.

जोधपूरमधील आश्रमात 2013 साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला एप्रिल 2018 साली न्यायालयाने दोषी ठरवले होते. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात आसाराम बापूने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.