वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकचे प्रत्यार्पण करण्यास मलेशियाने नकार दिला असतानाच भारताला आता संयुक्त अरब अमिरातीनेही (यूएई) धक्का दिला. यूएईत अटक झालेल्या फारुख देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले असून देवडीवालाची चौकशी करता यावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला पाकिस्तानी तपास यंत्रणांच्या ताब्यात दिल्याने भारतासाठी हा धक्का मानला जात आहे.

देवडीवाला हा छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो शारजामध्ये लपून बसला होता. तो इंडियन मुजाहिद्दीनसाठीही काम करायचा. मे महिन्यात त्याला यूएईतील तपास यंत्रणांनी अटक केली होती. भारताने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हावी, यासाठी इंटरपोलकडे पाठपुरावा केला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील होत्या. दोन भारतीयांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याप्रकरणात देवडीवाला आरोपी आहे.

देवडीवाला हा छोटा शकीलसाठी काम करायचा. देवडीवाला हा मूळचा गुजरातचा असून तो काही काळ मुंबईतही वास्तव्यास होता. गुजरात दंगलीनंतर २ किलो आरडीएक्स पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. २००३ मध्ये तो देशाबाहेर पळाला होता.

मे महिन्यात देवडीवालाला अटक होताच, भारतीय तपास यंत्रणांनी तो भारतीय नागरिक असल्याचे पुरावे देखील यूएईला दिले होते. तर पाकिस्तानी तपास यंत्रणांनी देवडीवाला हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला होता. देवडीवाला हा पाकिस्तानी नागरिक असून त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचा दावा पाकिस्तानी तपास यंत्रणांनी केला होता. अखेर दुबईने देवडीवालाचे पाकिस्तानकडे प्रत्यार्पण केले असून भारतासाठी हा हादरा आहे.