विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांना शनिवारी मोठा हादरा बसला. विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेत तोगडिया गटाचा हा अंत मानला जात आहे.

प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही संघ परिवारातील असले तरी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. विश्व हिंदू परिषदेत पहिल्यांदा निवडणूक घेऊन प्रवीण तोगडिया यांचा विश्व हिंदू परिषदेतील वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने संघ आणि भाजपा तोगडिया यांच्यावर नाराज होते. त्यामुळे ५२ वर्षांनंतर विश्व हिंदू परिषदेत निवडणूक झाली.
शनिवारी हरयाणातील गुरुग्राम येथे विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक झाली. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रवीण तोगडिया यांच्या गटातील राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांच्यात लढत होती. यात कोकजे १३१ मते मिळवून राघव रेड्डींचा पराभव केला. राघव रेड्डींना फक्त ६० मते मिळाली.

विंहिपच्या कार्याध्यक्ष पदासाठी आलोककुमार, कार्याध्यक्ष (विदेश विभाग) अशोकराव चौगुले, महामंत्रीपदासाठी मिलिंद पांडे, संघटन महामंत्रीपदी विनायकराव देशपांडे यांची निवड करण्यात आली.