भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला शुक्रवारी ब्रिटिश न्यायालयाने दणका दिला. न्यायालयाने विजय मल्ल्याला भारताच्या १३ बँकांना २ लाख पाऊंड्सची (१ कोटी ८० लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

लंडनमधील न्यायालयाच्या न्या. अँड्र्यू हेन्शॉ यांनी गेल्या महिन्यात आयडीबीआयसह अन्य भारतीय बँकांना भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यास पूर्ण मुभा दिली होती. तब्बल दीड अब्ज डॉलरच्या वसुलीसाठी भारतीय बँकांनी हा खटला दाखल केला होता. आपल्या जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश रद्दबातल ठरवावा, ही मल्ल्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विजय मल्ल्याला भारतीय बँकांना २ लाख पाऊंड्सची भरपाई देण्याचे आदेश दिले.

मार्च २०१६ पासून विजय मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशात आता बँकांनी केलेले दावे वैध ठरवल्याने विजय मल्ल्याच्या अडचणीत भर पडली आहे.