महिलांवरील अत्याचारासंदर्भातील खटले दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटना वाढत असण्याची शक्यता आहे, असे सांगत महिला अत्याचाराशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालये स्थापन करा, असे आदेश सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांनी देशातील सर्व उच्च न्यायालयांना दिले आहेत.
उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीशांनी दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. या घटनेने देशाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला आहे. या प्रकरणाने देशाच्या कायदा व सुव्यवस्थेवर कधीही न पुसता येण्यासारखा डाग लावला आहे. त्यामुळे आता अशा प्रकरणाच्या खटल्यांचा तातडीने निपटारा केला पाहिजे, असे सरन्यायाधीशांनी म्हटले.
महिलांविरोधातील गुन्हय़ांच्या खटल्यांचा निकाल लागण्यास विलंब होतो. त्यांच्या विरोधातील गुन्हे वाढण्याचे हे एक कारण असू शकते. विविध उच्च न्यायालयांमध्ये महिलांसंदर्भातील खटले मोठय़ा प्रमाणावर अनिर्णीत स्थितीत आहेत. या प्रकारचे खटले झटपट निकाली काढण्याची वेळ आली आहे. याकरिता नेमावयाच्या न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या संदर्भात मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारच्या संपर्कात राहायला हवे. पुरेसे कर्मचारी या न्यायालयांसाठी उपलब्ध होतील, याकडेही लक्ष द्यावयास हवे. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना काही जलदगती न्यायालये निश्चित सुरू करता येतील. या न्यायालयांमध्ये फक्त महिलांविरोधातील गुन्हय़ांचे खटले चालविले जाणे अपेक्षित आहे. यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारांकडून न्यायसंस्थेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होईल, असे मला वाटत नाही, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले आहे.

दिल्ली बलात्कार प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना वकील, पोलीस आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रचंड गर्दीमुळे महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करता आले नाही.  आरोपींना हजर करण्यासाठी न्यायालयात जागाच उरली नव्हती. त्यातच आरोपींचे वकीलपत्र घेण्यासाठी ऐनवेळी उपस्थित झालेल्या वकिलांमुळे गोंधळ झाला. या प्रकरणाची बंद खोलीत सुनावणी करण्याच आदेश न्यायमूर्ती नम्रता अग्रवाल यांनी दिले आहेत. पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.

तरुणीही आरोपींइतकीच दोषी – आसाराम बापू
दिल्लीतील बलात्कारप्रकरणी फक्त पाच ते सहा आरोपी दोषी नाहीत. बलात्कार करणाऱ्यांइतकीच बलात्कारित तरुणीही या प्रकारात दोषी आहे. तिने बलात्कार करणाऱ्यांशी भावाचे नाते जोडून त्यांच्याकडे ते करीत असलेले कृत्य थांबविण्यासाठी याचना करावयास हवी होती. यामुळे तिची प्रतिष्ठा आणि जीव वाचला असता. एका हाताने टाळी वाजू शकते? वाजू शकते असे मला वाटत नाही.. अशी धक्कादायक प्रतिक्रिया स्वघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांनी येथे व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, या तरुणीने सरस्वती मंत्राचे पठण केले असते, तर तिने आपल्या मित्राबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर कोणत्याही बसमधून प्रवास केला नसता.