ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठ्या कोळसा खाणीत खाणकाम करण्याच्या भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या महत्त्वाकांक्षेवर ऑस्ट्रेलियन न्यायालयाने पाणी फेरले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने गेल्या वर्षी अदानी यांना कारमायकेल खाण प्रकल्पात खाणकाम करण्यासाठी देऊ केलेला परवाना न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथील कारमायकेल या खाण प्रकल्पाचा परवाना देताना समुद्र तट आणि परिसरातील प्राणीमात्रांच्या अस्तित्वाला निर्माण होणाऱया धोक्याचा विचार करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱया ऑस्ट्रेलियातील मॅके ग्रुपने अदानींच्या कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत जोपर्यंत कायदेशीर परवानगी मिळत नाही, तोवर अदानींच्या कोळसा खाणीचे खोदकाम थांबवले जाणार असल्याचा निर्णय न्यायालायने दिला आहे. यापुढे सर्व कायदेशीरबाबींची पूर्तता केल्यानंतरच ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण मंत्र्यांना अदानी यांना पुन्हा परवाना देता येईल, मात्र पुन्हा परवाना द्यावा की नाही याचे सर्व अधिकार पर्यावरण मंत्र्यांकडेच असणार आहेत, असे अदानींच्या खाणींविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील सु हिग्गिन्सन यांनी सांगितले.