पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब मंत्रिमंडळातील फेरबदलात मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. याच अध्यायात आता आणखी दोन आमदारांची भर पडली असून या दोन्ही आमदारांनी पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. संगरूर जिल्ह्यातील अमरगडचे आमदार सुरजितसिंग धीमान आणि फजिल्कामधील बलुआनाचे आमदार नत्थू राम यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख सुनील जाखड यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

काँग्रेसने पक्ष प्रमुख राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी नऊ नव्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. त्यांच्या शपथविधी समारंभाच्या काही वेळ आधी आमदारांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यापूर्वी आमदार संगतसिंग गिलजियां यांनी याच मुद्द्यावरून अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि पंजाब प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष पदाचा शुक्रवारीच राजीनामा दिला होता.

नत्थू राम यांनीही सरचिटणीस पदाचा राजीनामा जाहीर करत पक्षाकडून दलित समाजाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप केला. तर सुरजितसिंग धीमान यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांचा मुलगा जसविंदर धीमान यांनी सांगितले. राम हे दलित वर्गातून येतात तर सुरजित हे मागास वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात.

पंजाबमध्ये दलितांची ३४ टक्के लोकसंख्या आहे. जर आकड्यांचा विचार केला तर मंत्रिमंडळात किमान ५ दलितांना स्थान हवे. मला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे दलितांना हे अपमानास्पद वाटत असल्याचे दोन वेळा निवडून आलेले आमदार राम यांनी म्हटले.