वरिष्ठ वकील आणि पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते एच एस फुलका यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. फुलका यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबमध्ये ‘आप’ला हादरा बसला असून पक्षनेतृत्वाने पंजाबकडे दुर्लक्ष केल्याने फुलका हे नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी फुलका यांनी राजीनाम्यासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे.

1984 मधील शीखविरोधी दंगली प्रकरणी पीडितांच्या बाजूने प्रदीर्घ न्यायालयीन लढा देणारे एच. एस. फुलका यांनी 2014 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. न्यायालयीन लढ्याकडे लक्ष द्यायचे आहे, असे सांगत त्यांनी 2015 मध्ये पक्षातील सर्व पदांवरुन राजीनामा दिला होता. 2017 मधील विधानसभा निवडणुकीत ते आपच्या तिकिटावर पंजाबमधून निवडून आले होते. मात्र, काही महिन्यांतच राज्यातील आप नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

गुरुवारी फुलका यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण अद्याप सांगितलेले नाही. आपचे पंजाब विधानसभेत 19 आमदार असून सुखपालसिंह खैरा आणि आमदार कंवर संधू या दोघांना पक्षविरोधी कारवायांप्रकरणी नोव्हेंबरमध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते. यानंतर आता फुलका यांनी देखील राजीनामा दिल्याने ‘आप’च्या अडचणी वाढल्या आहेत.

फुलका का झाले नाराज?
आपच्या पक्षनेतृत्वाने पंजाब विभागाला गांभीर्याने घेतले नाही, अशी भावना फुलका यांच्या मनात निर्माण झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये आपमधील केंद्रीय नेतृत्वाकडून हस्तक्षेप वाढला होता. यामुळे पंजाबमधील पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज होते. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडून तरुण नेत्यांची फौज पंजाबमध्ये पाठवण्यात आली होती. ती लोक ज्येष्ठ नेत्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करत होते, असे समजते. तसेच, काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीसंदर्भात चर्चा सुरु असून यामुळे फुलका हे नाराज झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. ‘काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास मी पक्षाचा राजीनामा देणार, असा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता. फुलका यांनी शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसविरोधात प्रदीर्घ लढा दिला होता’, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.