दक्षिण चीन समुद्रापासून ते पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या चीनला रशियाने सर्वात मोठा झटका दिला आहे. रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनला रशियाकडून ही मिसाइल प्रणाली मिळणार होती. S-400 चा जगातील सर्वात घातक मिसाइल सिस्टिममध्ये समावेश होतो. फायटर विमानांपासून ते शत्रुचा मिसाइल हल्ला परतवून लावण्याची या सिस्टिममध्ये क्षमता आहे.
कुठल्याही देशासाठी एक प्रकारचे हे हवाई सुरक्षा कवच आहे. भारतानेही रशियाबरोबर S-400 सिस्टिम खरेदी करण्याचा करार केला असून पुढच्या काही महिन्यात भारताच्या ताफ्यात या घातक अस्त्राचा समावेश होईल.
सोहू यूएवायर या चिनी वर्तमानपत्राने रशियाने चीनला S-400 सिस्टिमचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दिले आहे. काही प्रमाणात हे चीनच्या हिताचे आहे, अशी सारवासारवही या वर्तमानपत्रातून करण्यात आली आहे. ‘शस्त्र मिळाल्यानंतर इनव्हॉईसवर स्वाक्षरी करण्याइतके बंदुक मिळवणे सोपे नाही’ असे या वर्तमानपत्राने लिहिले आहे.
“या शस्त्रांचा पुरवठा करणे कठीण आहे, असे ते रशियन म्हणतात. शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी चीनला आपली माणसे पाठवावी लागतात तसेच त्या शस्त्राचा वापर सुरु करण्यासाठी रशियाला सुद्धा टेक्निकल ज्ञान असलेली माणसे पाठवावी लागतात” असे सोहूने म्हटले आहे.
“रशियाला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यात आले. आता या मिसाइल सिस्टिमचा पुरवठा केला तर, पीपल्स लिबरेशन आर्मीचे करोना व्हायरस विरोधात जे काम सुरु आहे, त्यावर परिणाम होईल असे रशियाला वाटते. रशियाला चीनला संकटात टाकायचे नाही” असे चीनने म्हटल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. २०१८ साली चीनला रशियाकडून S-400 ची पहिली सिस्टिम मिळाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 1:12 pm