जयललिता यांचे पंतप्रधानांना पत्र

तमिळनाडूच्या सात मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली असून श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात मासेमारी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंबंधी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

सात मच्छीमारांचा गट रामेश्वरमच्या सागरात मासेमारी करत असताना श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्यावर कारवाई केली अशी माहिती रामेश्वरम मासेमारी संघटनेचे अध्यक्ष टी. सेसूराजा यांनी सांगितले आहे.

तब्बल ४५ दिवसांनंतर मासेमारीसाठी सुरुवात करणाऱ्या मच्छीमारांवर पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली. मासे प्रजननाच्या कालावधीमुळे ४५ दिवस मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. तालायमन्नार येथे चर्च बांधण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असल्याचे जयललिता यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईनंतर त्यांच्या बोटी आणि मासेमारीचे साहित्यही जप्त करण्यात येते, याकडेही जयललिता यांनी लक्ष वेधले आहे.

पंतप्रधानांनी श्रीलंकेशी उच्च स्तरीय चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी जयललिता यांनी केली आहे. तसेच, परराट्र मंत्रालयानेही यावर तातडीने तोडगा काढावा, असेही जयललितांनी सांगितले.