बंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी व्होल्व्हो बसला बुधवारी मध्यरात्री आग लागून त्यामध्ये सात प्रवासी मृत्युमुखी पडले, तर अन्य ४० जण जखमी झाले.
येथून जवळ असलेल्या कुनीमेळी पुलाजवळ पहाटे अडीचच्या सुमारास या वातानुकूलित बसने दुभाजकास धडक दिल्यानंतर तिला आग लागली. यामुळे अनेक प्रवाशांनी आपत्कालीन द्वारातून उडय़ा मारून आपला जीव वाचविला, असे पोलिसांनी सांगितले. बसचालक नंतर पळून गेला, तर त्याचा साहाय्यक या दुर्घटनेचा बळी ठरला. मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेले होते. या वेळी पुणे येथे जात असलेल्या एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडल्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर जाणे शक्य होऊन त्यांचे प्राण वाचले. या आगीत जखमी झालेल्या प्रवाशांना हुबळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून किरकोळ जखमींवर हवेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमध्ये मुंबईच्या २८ प्रवाशांचा समावेश होता.