मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी तीनमजली ‘स्मृती’ कोसळून दहाजणांनी प्राण गमावल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी सकाळी पावणेसात वाजता दहिसर पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळचीच ‘पीयूष’ ही रिकामी इमारत कोसळून तिच्या आसऱ्याला थांबलेले सातजण मृत्युमुखी पडले तर सातजण जखमी झाले. जखमींवर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत फैय्याज शेख (२२), धर्मेद्र हरिहर (२२), आसीफ शेख (२), साबाजित यादव (४०), भागपती मानसिंह लगसाल (८), तर अन्य दोन जण (एक स्त्री व एक पुरुष-दोघांचे वय २५) हे मरण पावले असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
दहिसर (पूर्व) येथील यशवंत तावडे मार्गावरील ‘पीयूष’ ही पाच मजली इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच ती रिकामी केली होती. तेथील रहिवासी दुसरीकडे राहायला गेले होते, मात्र या रिकाम्या इमारतीचा वापर स्थानिक भाजीवाल्यांकडून रात्रीच्या निवासासाठी करण्यात येत होता, असे समजते. ३० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीचा वाद न्यायालयात गेला असल्याने ही इमारत पूर्णपणे पाडूनही टाकण्यात आली नव्हती.
शुक्रवारी रात्रीही काही भाजीविक्रेते या इमारतीत राहिले होते. सकाळी इमारत पत्त्यांच्या पानांसारखी खाली कोसळली तेव्हा तिच्या पडझडीच्या आवाजाइतकेच आक्रोशानेही वातावरण सुन्न झाले होते. घटनेचे वृत्त कळल्यानंतर महापालिका प्रशासन, अग्निशमन यंत्रणेचे कर्मचारी व अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे आठ बंब, मदत पथकाची वाहने, रुग्णवाहिका यांच्या सहायाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. दुपारनंतरही मदतकार्य सुरू होते. ढिगाऱ्याखालून सात जखमींना बाहेर काढले जाताच आप्तांनी सुटकेचा निश्वास टाकला. परिसरात बघ्यांची गर्दी उसळल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.
या अपघातात प्रमोद प्रजापती हा  गंभीर जखमी झाला आहे. अन्य जखमींमध्ये अनिलकुमार गुप्ता, संतोष घोणे, रणजीत मौर्या, रामभरोसे राजभर, गोविंद गुप्ता यांचा समावेश आहे. सात वर्षांची मुलगी पवित्रा हिला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

मृत्यूचे थैमान टळले..
दहिसरची इमारत दुर्घटना आणखी अध्र्या तासांनी घडली असती तर इथल्या ‘यशवंत तावडे मार्गा’वर शनिवारी मृत्यूचे थैमानच दिसले असते.
दहिसर (पूर्व) स्थानकाला लागून असलेला हा मार्ग भाजी गल्ली म्हणून ओळखला जातो. सकाळी सहा-साडेसहापासून ही गल्ली भाजीच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी गजबजते. सातच्या सुमारास तर ही गजबज टीपेला पोहोचते. कारण, ट्रक भरभरून आलेला भाजीपाला नेण्यास किरकोळ विक्रेत्यांची गर्दी होते.  
सुदैवाने इमारत कोसळली त्या वेळेस भाज्या उतरविणारे काही घाऊक व्यापारी आणि मजूर वगळता येथे फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे, मृत्यूने घाला घातला तेव्हा भाजी उतरवून घेण्यासाठी आलेले मनोज प्रजापती (वय २८) आणि त्यांच्यासोबत असलेले अनिल गुप्ता (वय २१) हे दुर्घटनेत सापडले. हे दोघे जखमी असून बोरिवलीच्या भगवती रूग्णालयात उपचार घेत आहेत. भाजी घेऊन आलेल्या दोन ट्रकमुळे ते दोघे बचावले. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा ट्रकवर कोसळला. ट्रकखाली अडकलेल्या या दोघांना अग्निशामक जवानांनी अवघ्या दहा मिनिटात काढले, असे या इमारतीसमोरच भाजी विकणारे सोनू चौरसिया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
इमारतीलगत असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावरील कर्मचारीही या दुर्घटनेत बळी पडले आहेत. या इमारतीला दुरूस्तीकरिता परवानगी दिली होती. मात्र, भाडेकरू आणि मालक यांच्या न्यायालयीन वादात दुरूस्ती रखडल्याची माहिती प्रभाग अधिकारी संतोषकुमार धोंडे यांनी दिली.
इमारतीच्या देखभालीसाठी साबाजित यादव (वय ४०) यांची सुरक्षारक्षकांची नेमणूक झाली होती. तो मुलगी, जावई आणि नातीसह येथेच राहत होता. यादव यांच्यासह संपूर्ण कुटुंबच या दुर्घटनेत बळी गेले आहे. इमारत धोकादायक असताना त्यांना तेथे राहण्यास परवानगी का देण्यात आली असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.

ठाण्यातही इमारत कोसळली
शुक्रवारी मध्यरात्री ठाण्यातील नौपाडा परिसरातील रामवाडी भागातील ‘सावित्री दीप’ या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्याने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. शुक्रवारी मध्यरात्री या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग शेजारच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या कारवर कोसळला. यात कारचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे. ही इमारत महापालिकेने आधिच धोकादायक म्हणून घोषिक केल्याने येथे कोणीही राहत नव्हते. यामुळे संभांव्य जीवितहानी टळली. असे असले तरी या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंनी अद्यापही आपले सामान हलविले नसल्याने ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

धोकादायक इमारतींची संख्या नऊशेहून अधिक
काही दिवसांपूर्वी मालाड येथील कोसळलेली ‘अल्ताफ मॅन्शन’ आणि शनिवारी दहिसरला कोसळलेल्या ‘पीयूष’ इमारतीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहर आणि उपनगरात राहणाऱ्या अशा धोकादायक इमारतींमधील हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दोन इमारतींच्या दुर्घटनांमुळे पावसाळा संपेपर्यंत आणखी किती इमारती कोसळणार व किती जणांचे जीव जाणार, या काळजीने रहिवाशांच्या पोटात गोळा उठला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात नऊशेहून अधिक इमारती धोकादायक अवस्थेत आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहर आणि उपनगरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. इमारतींना नोटीस पाठविण्यात येते. या इमारतींमधील रहिवाशांनी जागा सोडून अन्यत्र राहायला जावे, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात येते. मात्र अपवाद वगळता धोकायदायक इमारतींमधून रहिवासी दुसरीकडे राहायला जात नाहीत. जुन्या चाळी/इमारतींचे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, पुनर्विकासास होणारा विलंब यामुळे रहिवासी आपले घर सोडून जात नाहीत. धोकादायक इमारतींची वीज आणि जलजोडणी तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र रहिवासी इमारत सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जात नसल्याने तसेच राजकीय दबावामुळे या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही.  
 मुंबई शहर आणि उपनगरात ५६८ खासगी तर २३८ उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. महापालिकेच्या मालकीच्या ७८ हून अधिक धोकादायक इमारती असून यापैकी ३३ इमारतींमधून रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भेंडीबाजार व डोंगरी परिसरात सर्वात जास्त म्हणजे ९४ धोकादायक इमारती असून भायखळा, माझगाव भागात ९० तर कुर्ला परिसरात ८० हून अधिक इमारती धोकादायक आहेत. ग्रंॅण्ट रोड ते भायखळा भागात १४२, पूर्व उपनगरात मुलुंड ते भांडुप परिसरात ४४ आणि पश्चिम उपनगरात १३८ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.