सीमेवर तणावाचे वातावरण  निवळण्यासाठी भारत व चीन यांच्यात लष्करी पातळीवरील सातव्या फेरीची चर्चा आज झाली. त्यात पूर्व लडाखमधून दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याबाबतचा विषय प्रमुख होता.

गेले सहा महिने दोन्ही देशात सीमेवर संघर्ष सुरू असून त्यावर लवकर तोडगा निघणे कठीण आहे. दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूला असलेल्या चुशूल येथे पूर्व लडाख भागात ही चर्चा झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह येथील चौदाव्या कोअरचे हरिंदर सिंग यांनी केले. त्यात पूर्व आशियाचे परराष्ट्र सह सचिव नवीन श्रीवास्तव हे सहभागी होते.

पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांचे सुमारे एक लाख सैनिक तैनात असून पूर्व लडाखमध्ये दोन्ही देश शक्तिप्रदर्शन करीत आहेत. संघर्ष निवळण्यासाठी राजनैतिक व लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. भारताने या चर्चेत सर्व संघर्ष ठिकाणांहून चीनला सैन्य माघारीसाठी भाग पाडण्याची भूमिका घेण्याचे ठरवले. जैसे थे परिस्थिती लवकर निर्माण करून ती एप्रिलपूर्वी होती तशी करावी अशी भारताची मागणी आहे.