बंगळुरू-अर्नाकुलम इंटर सिटी एक्सप्रेस येथे रुळावरून घसरल्याने नऊ प्रवासी ठार व ६० जण जखमी झाले. त्यातील १६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या रेल्वेवर दरड कोसळून ती रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. ही गाडी सकाळी सव्वासहा वाजता बंगळुरू येथून निघाली व ७.३५ वाजता अनेकल रोड व होसूर दरम्यान घसरली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले, की रेल्वेमार्गावर दरड कोसळून तिचा फटका या रेल्वेला बसला. दुपारनंतर रेल्वे मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रूपये, गंभीर जखमींना ५० हजार तर जखमींना २० हजार रूपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
तामिळनाडू व कर्नाटक यांच्या सीमेवर हा अपघात झाला आहे. रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना सर्व प्रवाशांना वैद्यकीय मदत देऊन अडकून पडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यास सांगण्यात आले आहे.
मदतकार्य चालू असून मृतांची संख्या त्यानंतरच निश्चित कळेल असे कर्नाटकचे गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले.
या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याकरिता चौकशीचे आदेश देण्यात आले असून, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आल्याचे रेल्वेमंत्री प्रभू यांनी सांगितले.
राज्याचे गृहमंत्री जॉर्ज यांनी सांगितले, की अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी पोलीस, वैद्यकीय व रेल्वेची मदत पथके पोहोचली आहेत. जखमींना होसूर व बंगळुरूच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री यू. टी. खादेर यांनी सांगितले, की कर्नाटक व तामिळनाडूची वैद्यकीय पथके घटनास्थळी गेली आहेत. तिरुअनंतपूरम येथील रेल्वे सूत्रांनी सांगितले, की केरळकडे येणारे दोन प्रवासी या घटनेत मरण पावले आहेत. रेल्वेने कोचीहून प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी खास बस सोडल्या आहेत.


प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी रेल्वेने हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत… 9448090599, 080 22371166, 080-22156553, 080-22156554.