दहशतवादी कृत्याचा पोलिसांना संशय

लंडन : सुप्रसिद्ध लंडन ब्रिजवर शुक्रवारी झालेल्या भोसकाभोसकीच्या प्रकारामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त असून पोलिसांनी याप्रकरणी एका इसमाला अटक केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकाराकडे पोलीस दहशतवादी कृत्य म्हणून पाहात आहेत.

लंडन शहरात झालेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलिसांनी या परिसराला वेढा घातला आहे. या घटनेनंतर तेथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली आहे.

या घटनेचा सविस्तर तपशील हाती आला नसला तरी सुरक्षा दलांनी एका इसमाला गोळ्या घातल्याचे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले आहे.

हा प्रकार नक्की कोणत्या कारणास्तव घडला हे सुस्पष्ट झाले नसले तरी आम्ही याकडे दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लंडन रुग्णवाहिका सेवेने ही मोठी घटना असल्याचे म्हटले आहे.

लंडन ब्रिजवर भोसकाभोसकीचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस अधिकारी संशयिताला पकडत असतानाची दृश्ये समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. लोक भयभीत होऊन ब्रिजवरून पळतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या ब्रिजवरील वाहतूक थांबविण्यात आली असून या परिसरातील कार्यालये आणि इमारतींना टाळे ठोकण्यात आले आहे.

लंडन ब्रिजवरील घटनेची आपल्याला सातत्याने माहिती देण्यात येत असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. या प्रकारामुळे आपण चिंतित झाल्याचे गृहमंत्री प्रिती पटेल यांनी म्हटले आहे.

लंडन ब्रिजला आयसिसने २०१७ मध्ये लक्ष्य केले होते, त्या वेळी दहशतवाद्यांनी आपल्या वाहनाने पादचाऱ्यांना चिरडले होते आणि त्यानंतर करण्यात आलेल्या भोसकाभोसकीत ११ जण ठार झाले होते.