उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून मोठय़ा प्रमाणावर धुके पसरून झालेल्या अपघातांमध्ये उत्तर प्रदेशात आठजण ठार झाल्याचे वृत्त आहे. याखेरीज, अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
राजधानीत शनिवारी थंड वारे वहात होते. तेथे किमान तापमान ७.२ तर कमाल तापमान १७.५ अंश एवढे नोंदविण्यात आले. पहाटे अनेक भागांमध्ये धुक्याचे साम्राज्य पसरल्याने रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली होती. मात्र नंतर दिवस उजाडल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील कडुरा भागात धुक्याच्या परिणामी कमी दृश्यमानतेमुळे एक ट्रक कालव्यात कोसळून आठजण ठार आणि ३४ जण जखमी झाली. राज्यात धुक्यामुळे रेल्वे, रस्ते व हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती.
श्रीनगर शहरातही शनिवारी रात्री किमान तापमान उणे ४.४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्यामुळे थंडीचा कडाका मोठय़ा प्रमाणावर जाणवत होता. लेह येथे उणे १३.९ तर कारगिल, लडाखमध्ये उणे १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत कडाक्याच्या थंडीमुळे वीज व पाणीपुरवठा खंडित झाला होता. मात्र, तो आता पूर्ववत करण्यात येत आहे.