महाराष्ट्रासह परदेशातूनही मागणी

देशात प्रथमच केरळमध्ये गटार साफ करण्यासाठी यंत्रमानव म्हणजे रोबोचा वापर केला जाणार आहे. या यंत्रामानवाची निर्मिती जेनरोबोटिक्स या स्टार्टअप कंपनीने केली असून पुढीलआठवडय़ात हा यंत्रमानव बाजारात येत आहे. त्याचा वापर आम्ही करणार आहोत, असे केरळ पाणीपुरवठा प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक ए शैनामोल यांनी सांगितले.

केरळ सरकार या प्रकल्पाबाबत उत्सुकता बाळगून आहे. हा यंत्रमानव वायफाय, ब्लूटूथ व नियंत्रक व्यवस्थेने युक्त असून त्याला चार बाहू असून बादली  जोडलेली आहे. त्याच्या मदतीने गटारीतील घाण  बाहेर काढता येते. या प्रकल्पाला केरळ जल प्राधिकरणाचा पाठिंबा असून त्यांचा सक्रिय सहभाग त्यात आहे. नवीन कल्पनांचे रूपांतर तंत्रज्ञानात करण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक बुध्दिमान तरुणांच्या नवकल्पनांचा वापर यात केला जात असून त्यात पाईप गळती व मैला पाणी या समस्यांवर उपाय करता येईल. या यंत्रमानवाचे नाव बँडीकोट असून त्याचा वापर तिरूअनंतपूरममधील पाच हजार गटारी साफ करण्यासाठी केला जाणार आहे. या यंत्रमानवाचे यशस्वी प्रात्यिक्षक करून दाखवण्यात आले आहे असे जेनरोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विमल गोविंद यांनी सांगितले. काही तरुणांनी त्यांच्या कायमस्वरूपी नोकऱ्या सोडून हे काम हाती घेतले आहे. मैलापाणी वाहून नेणे व गटारी साफ करण्याचे काम अजूनही काही लोक करतात त्यात त्यांना प्रसंगी प्राण गमवावे लागतात व त्यांना त्यासाठी केवळ तीनशे ते पाचशे रुपये मिळतात. शिवाय असे काम माणसांकडून करून घेणे हा मानवतेला काळिमा आहे त्यामुळे यंत्रमानवाच्या माध्यमातून गटारी साफ करून घेणे ही चांगली संकल्पना आहे. येथील मेडिकल कॉलेजजवळ यंत्रमानवाने एक गटार साफ केले त्यात ३० किलो कचरा होता. त्यात नॅपकिन्स, कपडे, सर्जिकल ब्लेडस यांचा समावेश होता. काही तासांत हा यंत्रमानव किमान चार गटारी साफ करतो. यात यंत्रमानव कसा वापरायचा याचे प्रशिक्षण माणसांना द्यावे लागणार आहे. दूरनियंत्रित मोटारीप्रमाणे तो चालवला जातो. सध्या तरी तो इंग्रजी भाषेतील सूचनाच  ऐकतो पण त्याला स्थानिक भाषा शिकवणे अवघड नाही.  २ मार्चला अतुक्कल पोंगलाच्या वेळी या यंत्रमानवाची कसोटी आहे, कारण त्यावेळी लाखो महिला येथे पोंगलच्या वेगळ्या विधीसाठी येत असतात.