शालेय मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची काहीच गरज नसून, त्यापेक्षा योगविद्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक केली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी केले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा की नाही, यावरून चर्चेला सुरुवात झाली आहे.
दिल्लीसंदर्भात लिहिलेल्या एका विस्तृत अहवालात त्यांनी शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची अजिबात गरज नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरांची शिक्षणाच्या माध्यमातून माहिती करून देतानाच मूल्याधारित शिक्षणाची कास धरली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन यांनी कंडोम वापरण्यावरून केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. एड्स रोखण्यासाठी कंडोम वापरण्यापेक्षा स्त्रीएकनिष्ठता जास्त उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर समाजातील काही गटांकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याची सारवासारवही केली होती.