जर्मनीमधील सर्वात गजबजलेल्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या बर्लीन शहरातील शॉनफेल्ड विमानतळ काही दिवसापूर्वी एका विचित्र कारणामुळे काही काळासाठी बंद करावे लागले. सुरक्षा उपकरणांनी एका प्रवासी बॅगमधील व्हायब्रेटर्स आणि सेक्स टॉइजला बॉम्ब असल्याचे समजल्याने हा गोंधळ झाला. या गोंधळानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळाचा काही भाग काही तासांसाठी बंद करण्यात आला.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार विमानतळामध्ये प्रवेश करण्याआधी होणाऱ्या तपासणीदरम्यान एक्स रे मशिनमध्ये संशयास्पद वस्तू अढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११च्या सुमारास हा प्रकार घडल्याने विमातळावरील टर्मिनस ‘डी’वर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने टर्मिनस डी रिकामा केला. त्यानंतर विमानतळावरील उद्घोषणा कक्षामधून संबंधित बॅगच्या मलकाला सुरक्षा यंत्रणांकडे बॅगेमधील वस्तू काय आहे यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी हजर होण्यास सांगण्यात आले. मात्र या प्रवाशाने बँगमधील वस्तू हा तांत्रिक उपकरण असल्याची माहिती दिली. मात्र या गोष्टीबद्दल अधिक माहिती देण्यास या प्रवाशाने नकार दिला. त्या प्रवाशाच्या अशा वागण्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अॅलर्ट जारी केला. लगेचच तेथे बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॅगेची चाचपणी केल्यानंतर काही मिनिटांनंतर त्या प्रवाश्याच्या बॅगेतील गोष्टी सेक्स टॉय असल्याचे समजले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

माहिती देण्यास आडमुठी भूमिका घेणाऱ्या संबंधित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर काही तासांनी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे विमानतळावरील डी टर्मिनस हे काही तासांसाठी बंद ठेवावे लागल्याने सात हजारहून अधिक प्रवाशांची गैरसोय झाली. दुपारच्या सुमारास या टर्मिनस वरील सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. प्रवाशांना याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. केवळ तपास यंत्रणांच्या महत्वाच्या कामामुळे टर्मिनस डी बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र या सेक्स बॉम्बमुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली हे मात्र खरे.

हा प्रकार घडला त्याच दिवशी जर्मनीमधीलच फ्रॅकफुर्ट विमानतळावर एका कुटुंबाची योग्य पद्धतीने तपासणी न करताच त्यांना विमानतळाच्या परिसरात प्रवेश देण्यात आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण टर्मिनस निर्मनुष्य करण्यात आले होते.