LinkedIn या जगात्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या सोशल नेटवर्कवर आता सेक्सवर्कर्सचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लिंक्डइन या सोशल साइटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’, ‘अॅडल्ट एंटरटेन्मेंट’ आणि ‘मसाज विथ हॅपी एंडिंग’च्या ऑफर दिल्या जात आहेत. या नेटवर्कवर सेक्स सर्व्हिसचे हे जाळे बंगळुरु, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी पसरले आहे.

लिंक्ड इन प्रोफाइलवर बंगळुरुच्या एका युवतीने कॉलगर्ल म्हणून स्वतःचा परिचय दिला आहे. पुष्पा (बदललेले नाव) बंगळुरुच्या इंदिरानगर, जेपी नगर, बांसवाडी, डोमलुर आणि कम्मनहाली भागात अनेक प्रकारची ‘मसाज सर्व्हिस’ देण्यासाठी सज्ज असल्याचे या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आले आहे. तिच्या प्रोफाइलमध्ये एका वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. ज्यामुळे ‘फुल बॉडी मसाज’, ‘हॅपी एंडिंग मसाज’ आणि ‘फिमेल टू मेल बॉडी मसाज’ यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या प्रोफाइलवर ज्या सेवा पुरवल्या जात आहेत त्यावर लिंक्ड इनने २०१३ मध्ये बंदी आणली आहे. लिंक्ड इन कंपनीने त्यांच्या युजर्सना एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायाशी संबंधित सेवा न देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अशा प्रकारच्या प्रोफाइल्समधून नियमांचे उल्लंघन होत असेल तर आम्ही कारवाई करू असे लिंक्ड इनने म्हटले आहे.

बंगळुरु येथील एक स्पाचे लिंक्ड इन अकाऊंट अनेक मसाज सर्व्हिस ची ऑफर ग्राहकांना देत असल्याचीही माहिती समोर आली आहे. दाक्षिणात्य मुलींकडून मसाज करवून घेण्याच्या ऑफर, केरळच्या मुलींकडून मसाज करून घेण्याच्या ऑफर या अकाऊंटद्वारे देण्यात आल्या आहेत.

याशिवाय वाशी, मुंबई, पीतमपुरा, दिल्ली आणि कोलकाता येथील अनेक मुलींच्या लिंक्ड इन प्रोफाइलवरही अशाच प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे LinkedIn ही साईट आहे की सेक्स वर्कर्सचा अड्डा असाच प्रश्न पडतो आहे. सोशल नेटवर्कच्या साथीने आणि छुप्या पद्धतीने ही अकाऊंट चालवण्यात येतात. यावर खरी ओळख लपवली जाते असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच यासंबंधीची कोणतीही तक्रार आलेली नाही म्हणून आम्ही कारवाई केली नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.