सूरतमध्ये दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याप्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, या गुजरात पोलीसांच्या मागणीवरील निर्णय गांधीनगरमधील न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. पोलीस आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
गुजरात पोलीसांच्या पथकाने सोमवारी जोधपूर पोलीसंकडून आसाराम बापू यांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी सकाळी न्यायालयात आणण्यात आले. सुनावणीवेळी केवळ सरकारी आणि बचाव पक्षाचे वकील आणि संबंधित व्यक्ती यांनाच न्यायालयाच्या आवारात सोडण्यात आले.
सूरतमधील दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीने आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी आसाराम यांना मुंबईमार्गे अहमदाबादला आणण्यात आले.