देशाचे मुख्य न्यायमुर्ती रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय न्यायाधीशांच्या चौकशी समितीला लिहिलेल्या पत्रामध्ये न्यायमुर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी पूर्ण न्यायालयाची मागणी केली आहे. पूर्ण न्यायालय म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांची नियुक्ती करणे. इंडियन एक्सप्रेसने सर्वप्रथम न्यायाधीश चंद्रचूड यांच्या पत्रासंदर्भात वृत्त दिले होते.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीशांना रविवार संध्याकाळपर्यंत पूर्ण न्यायालयासंदर्भात कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण न्यायालयाची मागणी केली आहे. न्यायमुर्ती बोबडे या चौकशीसमितीचे प्रमुख आहेत. दोन मे रोजी चंद्रचूड यांनी पत्रातल्या मुद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी न्यायमुर्ती बोबडे यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे म्हटले आहे.

चंद्रचूड यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये चौकशी समितीमध्ये बाह्य सदस्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त महिला न्यायमुर्तींची नावे सुचवण्यात आली आहेत. रुमा पाल, सुजाता मनोहर आणि रंजना देसाई या निवृत्त महिला न्यायमुर्तींचा समितीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.

आरोप करणाऱ्या महिलेने ३० एप्रिलला माघार घेतली. त्यामुळे महिलेच्या अनुपस्थितीत एक्स पार्टी बनवून चौकशीची प्रक्रिया पार पाडू नये असे न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी चौकशी समितीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लिहिलेले पत्र हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही. त्यांनी १७ पेक्षा जास्त न्यायाधीशांबरोबर अनौपचारिक चर्चा केल्यानंतर हे पत्र लिहिले आहे असे इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात २२ न्यायाधीश आहेत.