आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कविता आणि भाषणांमुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या शाब्दिक कोट्या आणि यमक जुळवणाऱ्या काव्यपंक्ती ऐकण्यासाठी अनेकजण त्यांची भाषणेही आवर्जून ऐकतात. उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या निरोप समारंभावेळी गुरूवारी राज्यसभेत याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरूण जेटली यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मातब्बरांनी आपल्या भाषणांमधून हमीद अन्सारींचे आभार मानले, त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, इतक्या सगळ्या दर्जेदार वक्त्यांच्या मांदियाळीतही रामदास आठवले यांनी आपल्या हटके भाषणशैलीने सभागृहात एकच हशा पिकवला.

हमीद अन्सारींना निरोप देण्यासाठी उभे राहिलेल्या आठवले यांनी भाषणाची सुरूवातच त्यांच्या खास कवितेने केली. ‘आप ने हम सभी का जीत लिया था दिल, इस लिए हमे आज बहोत हो रहा है फिल’ अशा लक्षवेधी काव्यओळी आठवले यांनी सभागृहात सादर केल्या. या दरम्यान सभागृहात सातत्याने हास्याची कारंजी उसळत होती. कविता सादरीकरणानंतर आठवले यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चिमटेही काढले. त्यानंतर हमीद अन्सारींचे आभार मानताना आणखी एक शाब्दिक कोटी केली. तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून आणखी पाच वर्षांची मुदतवाढ मिळावी, अशी खरंतर आमची इच्छा होती. मात्र, तुम्ही तिकडचे होता (काँग्रेस) आणि इकडून तुम्हाला उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणे अवघडच होते, हे वाक्य आठवलेंनी उच्चारल्यानंतर तर सभागृहातील अनेक सदस्य खळखळून हसले. स्वत: हमीद अन्सारींनाही आपले हसू आवरले नाही. त्यानंतर आठवले यांनी पुन्हा हमीद अन्सारींचे आभार मानत आपले भाषण आटोपते घेतले.