दिल्ली दंगलीसंदर्भात काँग्रेस नेत्यांकडून निवेदन सादर

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगलीसंदर्भात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. दिल्लीतील लोकांना शांततेने जगता यावे, यासाठी ‘राजधर्मा’चे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे करण्यात आली.

हिंसाचार दिवसागणिक उग्र होत असताना केंद्र सरकार तसेच नवनियुक्त दिल्ली सरकारने दंगल थांबवण्याऐवजी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे रस्त्यांवर अराजक माजले. हा हिंसाचार पूर्वनियोजत होता. झुंडीने मालमत्ता लुटल्या गेल्या आहेत. पण, दंगलखोरांना कोणीही अडवले नाही.  त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. राष्ट्रपतींनी काँग्रेसच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, ए.के. अँटनी, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, प्रियांका गांधी आदी नेत्यांचा समावेश होता. दिल्लीतील हिंसाचार ही देशासाठी लाजीरवाणी घटना असून केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.

निवदेनात उपस्थितीत केलेले प्रश्न

  •  दिल्लीत दंगल उग्र होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे होते?
  •  रविवार संध्याकाळापासून शहा कोणत्या पूर्वनियोजित कामात गुंतलेले होते की, त्यांना दिल्लीतील घडामोडींकडे बघायला वेळ नव्हता?
  •  दिल्लीचे मुख्यमंत्री तरी कुठे होते?
  •  हिंसाचार उग्र होण्यापासून रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला परिस्थितीची आगाऊ सूचना-माहिती मिळाली नव्हती की, ती मिळून सुद्धा केंद्रीय गृह मंत्रालयाने हिंसाचार रोखण्यासाठी वेळेवर पावले उचलली नाहीत?
  • रविवारी संध्याकाळी हिंसक घटना होण्याची शक्यता दिसत असताना ती टाळण्यासाठी पुरेसे पोलीस बळ पुरवले गेले होते का?
  •  पुरेसे पोलीस नसल्याने दंगलखोर मोकाट सुटले आणि हिंसा उग्र होत गेली असे दिसते. परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतरही अतिरिक्त पोलीस कुमक का पुरवली गेली नाही.

द्वेषाचे विष पाजण्याचे प्रयत्न -काँग्रेस

हिंसा चार दिवसांपूर्वी भडकवली असली तरी भाजपकडून द्वेषाचे विष पाजण्याचे प्रयत्न दिल्ली विधानसभा निवडणुकीपासूनच केले गेले आहेत. धार्मिक द्वेष आणि तणाव निर्माण करून अशांतता पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही विशिष्ट व्यक्तींकडून आणि गटांकडून केला जात आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात प्रक्षोभक विधाने केली गेली. समाजात फूट पडण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा कट रचला गेल्याचा आरोपही काँग्रेसने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला आहे.

काँग्रेस लोकांना भडकवत आहे – भाजप

नागरिकत्व दुरुस्ती कायदा झाल्यानंतर रामलीला मैदानावर सोनिया गांधी यांनी या कायद्याला विरोध करताना ही आरपारची लढाई असल्याचा नारा दिला होता. प्रियंका गांधी-वड्रा यांनी लाखो लोकांना कैदेत टाकले जाईल असे विधान केले होते. राहुल गांधी यांनी घाबरू नका काँग्रेस तुमच्या (मुस्लीम) बरोबर आहे, असे सांगितले होते. ही विधाने प्रक्षोभक नाहीत का, असा सवाल करत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस लोकांना भडकवत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही हे माहिती असून सुद्धा जाणीपूर्वक चुकीची विधाने करून काँग्रेसचे नेते लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही जावडेकर यांनी केला.

भाजपच्या नेत्यांना वाचविण्यासाठी न्या. मुरलीधर यांना हटवले – काँग्रेस

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणातील भाजपच्या काही नेत्यांना वाचविण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची बदली करण्यात आल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. या बदलीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार न्यायव्यवस्थेविरुद्ध सुडाचे राजकारण करीत असल्याचे उघड झाले आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. भाजपचे नेते परवेश वर्मा, कपिल मिश्रा आणि अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषमूलक भाषणाबद्दल त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर न नोंदविल्याबद्दल न्या. मुरलीधर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने संताप व्यक्त केल्यानंतर बुधवारी सायंकाळीच न्या. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी न्या. मुरलीधर यांच्या बदलीवरून सरकारवर जोरदार टीका केली. न्याययंत्रणेत गोंधळ निर्माण करण्याचा आणि जनतेमध्ये न्यायव्यवस्थेबाबत असलेल्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न निंदनीय आहे, असे प्रियंका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे. मध्यरात्री बदलीचे आदेश जारी करणे ही लज्जास्पद बाब आहे, असे त्यांनी ट्वीट केले आहे. या पार्श्वभूमीवर न्या. लोया यांचे स्मरण होत असल्याचे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तर या देशात जे न्याय देतात त्यांची गय केली जाणार नाही हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

हिंसाचार प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायमूर्तीची बदली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाने केलेल्या शिफारशीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. न्या. मुरलीधर यांच्या पीठासमोर दिल्लीतील हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषमूलक भाषणाबद्दल त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर न नोंदविल्याबद्दल पीठाने संताप व्यक्त केला त्याच दिवशी न्या. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना काढण्यात आली. सरन्यायाधीशांसमवेत चर्चा केल्यानंतर राष्ट्रपतींनी निर्णय घेतल्याचे विधि आणि न्याय मंत्रालयाने अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. तथापि, न्या. मुरलीधर यांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पदाची सूत्रे कधी स्वीकारावयाची आहेत त्याचा अधिसूचनेमध्ये उल्लेख नाही.

‘नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करा’

वॉशिंग्टन : दिल्लीतील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करून अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (यूएससीआयआरएफ) नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरेने कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आयोग आणि अन्य काही व्यक्तींनी हिंसाचाराबाबत केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असे भारताने म्हटले आहे. भारत सरकारने कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला संरक्षण दिले पाहिजे, असे मत आयोगाने मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचे वृत्ताच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.