आपल्या नागरिकांची काळजी करण्यास भारत समर्थ आहे, त्यांची काळजी करण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या देशवासीयांची काळजी करावी, असे सडेतोड उत्तर केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी पाकिस्तानला दिले आहे. भारताने चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असा अनाहूत सल्ला  पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिला आहे, त्याला सिंह यांनी हे सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय जनता पक्षानेही मलिक यांच्या विधानावर हल्ला चढविला. पाकिस्तानने त्यांच्या देशातील अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण करावे, असे भाजप प्रवक्ते राजीव प्रताप रुढी यांनी सांगितले. तर हिंदू दहशतवादाबाबत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानानंतरच पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्यास बळ मिळाले, असा दावा भाजपचे दुसरे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी केला. जगामध्ये मुस्लिमांसाठी भारत हा सर्वात सुरक्षित देश आहे, तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक नेहमीच असुरक्षित असतात. भारताने या विषयावर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलवून समज द्यावी, अशी मागणीही हुसेन यांनी केली. शाहरुख खाननेही रेहमान मलिक व जमात उल दावाचा संस्थापक हफीझ सईद यांच्या वक्तव्यांचा तात्काळ निषेध करावा, असे हुसेन यांनी सांगितले.
 मलिक यांनी आपले घर नीट सांभाळावे, अशी टीका केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. बहुसंख्यापेक्षा अल्पसंख्याकांचे हिताचे संरक्षण कसे होते ही लोकशाही व्यवस्थेमधील मुख्य कसोटी असते, यूपीए सरकार भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना दिलेल्या समान हक्कांची जपणूक करण्यास कटिबद्ध आहे. मलिक यांनी भारताला सल्ले देण्यापेक्षा आपल्या देशातील अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी, असा सल्ला तिवारी यांनी दिला.