वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची तुलना मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्याशी केली आहे. शाहरुख दहशतवादी हाफिज सईदची भाषा बोलत असून त्याला जर या देशात टोकाची असहिष्णुता कुठे दिसत असेल तर त्याने पाकिस्तानात जावे, असा सल्ला आदित्यनाथ यांनी दिला आहे.

भारतात टोकाची असहिष्णुता असल्याचे वक्तव्य शाहरुखने त्याच्या ५० व्या वाढदिवशी केले होते. त्यानंतर शाहरुखवर टीका होण्यास सुरूवात झाली. आदित्यनाथ म्हणाले की, सेक्युलरतेच्या बुरख्याखाली काही कलाकार आणि साहित्यिक राष्ट्रविरोधी भाषा करू लागलेत. दुर्देव असे की, शाहरुख देखील त्यांच्याप्रमाणेच बोलू लागला आहे. अशा विधानांमुळे समाजातील मोठा गट त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकू शकतो. मग त्यालासुद्धा एका सामान्य मुस्लिमाप्रमाणे जीवन जगावे लागेल याची जाणीव त्याने ठेवावी. कलाकार आता दहशतवाद्यांची भाषा करू लागले आहेत. मला वाटतं की, शाहरुख आणि हाफिज सईदच्या भाषेत कोणताही फरक नाही.

दरम्यान, आदित्यनाथ यांचे वक्तव्य निंदनीय असून त्यामुळे देशात तणाव निर्माण करणारे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.