संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल आणि ओडीशा या दोन राज्यांना अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला. पाऊस आणि वादळी वारे यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली. या तडाख्यामधून सावरण्यासाठी पश्चिम बंगालने श्रमिक एक्सप्रेसद्वारे राज्यात येणाऱ्या कामगारांना काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी पश्चिम बंगाल आणि ओडीशा या दोन राज्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं. आयपीएलमध्ये पश्चिम बंगालचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स या संघानेही आपली सामाजिक जबाबदारी ओळखत महत्वाचं पाऊल उचललं आहे.

अम्फान चक्रीवादळात पश्चिम बंगालमधील अनेक झाडं कोसळून खाली पडली आहे. KKR संघाने संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये ५ हजार झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच चक्रीवादळात ज्या नागरिकांच्या घराचं नुकसान झालंय, त्यांची जबाबदारी घेण्याचीही तयारी KKR संघाने दाखवली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन KKR ने या मदतकार्यासंदर्भात घोषणा केली आहे.

KKR संघाचे ५५ टक्के समभाग बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या Red Chillies Entertainment या कंपनीकडे आहेत, तर उर्वरित ४५ टक्के समभाग हे मेहता ग्रूपकडे आहेत. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो. अम्फानच्या तडाख्यात पश्चिम बंगालमध्ये सुमारे ८० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.