केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याचे म्हणणे योग्यच असल्याचे म्हटले आहे. शाहीद आफ्रिदीने बुधवारी असे वक्तव्य केले होते की जे लोक पाकिस्तान सांभाळू शकत नाहीत ते काश्मीर काय सांभाळणार. आफ्रिदीची भूमिका योग्य आहे असे आता राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर काश्मीर कालही भारताचा भाग होता, आजही आहे आणि उद्याही असेल या आपल्या म्हणण्याचा पुनरुच्चारही केला.

नेमके काय म्हटला होता आफ्रिदी?
पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही, पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाहीयेत, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये, असं आफ्रिदी म्हणाला. सोशल मीडियावर आफ्रिदीच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ‘काश्मीर हा काही मुद्दा नाहीये, पाकिस्तानलाही काश्मीर नकोय…त्यांच्याकडून तर तेथील जनताच सांभाळली जात नाही. काश्मीर भारतालाही देऊ नका… मी म्हणतो काश्मीरला स्वतंत्र राहुद्या…माणुसकी मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचा तेथे मृत्यू होतोय…ते कोणत्याही धर्माचे असोत…माणूस म्हणून दुःख होतं…किमान माणुसकी तरी जिवंत राहुद्या’ असं आफ्रिदीने म्हटल्याचं दिसून येतं आहे.