बिहार सरकारमधील उद्योग मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या शाहनवाज हुसैन यांनी देशातील मुस्लिमांच्या सुरक्षेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शाहनवाज यांनी देशातील मुस्लीम पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देत कोणालाही असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी आपल्याला कळवावं. त्या मुस्लिमांच्या सुरक्षेची खात्री मी देईन, असं म्हटलं आहे. शाहनवाज यांनी भारतासारखा चांगला देश, हिंदूपेक्षा चांगला मित्र आणि मोदींपेक्षा अधिक चांगला नेता मुस्लिमांना मिळू शकत नाही, असंही म्हटलं आहे. मुस्लीम भारतात पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी आहेत. इतर इस्लामिक देशांमध्ये मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाहीय, असंही शाहनवाज म्हणालेत.

शाहनवाज हे उदयपुरमध्ये एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवीन जबाबदारीसंदर्भात बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील उद्योग व्यवसाय वाढवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असं शाहनवाज म्हणाले. मात्र बिहारमधील उद्योग व्यवसाय वाढवणे हे आव्हानात्मक आहे मात्र पक्ष मला कायमच कठीण काम देतो आणि ते काम मी चांगल्या पद्धतीने पूर्ण करेन असा विश्वास पक्षाला असतो, असंही त्यांनी सांगितलं. माझ्यावर पक्षाने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कमळ फुलवण्याची (निवडणुका जिंकण्याची) जबाबदारी टाकली होती आणि मी अगदी काश्मीरच्या खोऱ्यातही कमळ फुलवत ती पूर्ण केली, असं शाहनवाज यांनी आपल्या कामगिरीचा पाढा वाचताना सांगितलं.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन: लोकसभेच्या ४० जागांवर भाजपाला बसू शकतो फटका

शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य करताना शाहनवाज यांनी, “शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ज्यापद्धतीने गोंधळ घातला जात आहे तो पाहता शेतकरी असं सारं काही करेल असं वाटत नाही. शेतकऱ्यांविरोधात या सरकारची कोणतीही दुष्मनी नाहीय. मात्र देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा दिला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबद्दलच्या प्रश्नावर बोलातना, पेट्रोल-डिझेलच्या किंमती यापूर्वीही वाढल्यात आणि नंतर कमी झाल्यात, असं उत्तर शाहनवाज यांनी दिलं. यंदा इंधनाची किंमत वाढली आहे मात्र ती कमी होईल असा विश्वास शाहनवाज यांनी व्यक्त केला. इंधनदरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही शाहनवाज म्हणाले.

आणखी वाचा- मोदी सरकार नेरळ-माथेरान रेल्वेसहीत चार हेरिटेज रेल्वे ट्रॅक खासगी कंपन्यांना विकणार

काँग्रेसला सत्तेत राहता येत नाही आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणूनही त्यांना योग्य पद्धतीने काम करता येत नाही, असा टोलाही शाहनवाज यांनी लगावला आहे. शाहनवाज यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरही निशाणा साधला. दोन वर्षांमधील कामाचे होर्डिंग लावण्यापेक्षा राजस्थान सरकारने हे पैसे तलावांच्या संरक्षणासाठी वापरले असते तर बरं झालं असतं असं शाहनवाज म्हणाले.