25 September 2020

News Flash

एका सैनिकाच्या नजरेतून भारत…

भारत भ्रमणाबाबत त्याने लिहिलेला लेख महाजालावर व्हायरल होत आहे.

(Courtesy: Shalev Paller)

सैनिकांचे जीवन हे अनिश्चिततेनी भरलेले असते. सततच्या या वातावरणाने त्यांच्या मनावरील ताण वाढतो. इस्राईलच्या सैन्यातील टँक कमांडर पदावरून निवृत्त झालेला असाच एक सैनिक मन:शांतीसाठी भारत भ्रमणावर आला होता. भारत भ्रमणाबाबत त्याने लिहिलेला लेख महाजालावर व्हायरल होत आहे. शैलेव पालर नावाचा हा सैनिक २०१४च्या गाझा युध्दात सहभागी झाला होता. युध्दादरम्यान तो सतत कोणत्या ना कोणत्या मोहिमेवर असे, या अनिश्चिततेच्या वातावरणात जगत असताना घरी कधी परतणार याचीदेखील त्याला माहिती नव्हती. परंतु, या सर्वातून स्वत:ला कसे सावरले याविषयी त्याने लेखात लिहिले आहे. महाजालावर त्याचा हा लेख खूप प्रसिध्द झाला असून, आत्तापर्यंत अनेक लोकांनी शेअर केला आहे.

Paller(Courtesy: Shalev Paller)

त्याने आपल्या लेखात लिहिले आहे की, सैन्यात असताना जेव्हा घरचे मला कसे वाटते, असा प्रश्न विचारत, तेव्हा मला फार थोड्या गोष्टी आठवतं, त्यादेखील युध्दाशी निगडीत. मी कोणता भार घेऊन जगतो आहे हे जाणण्यासाठी आणि यातून सुटका मिळेल या आशेने मी भारत भ्रमणाचा निश्चय केला. येथील भोजन खूप स्वादिष्ट असते असे ऐकून होतो. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा मी जुन्या दिल्लीतील एका गजबजलेल्या बाजाराचा अनुभव घेतला. माझ्यासाठी सर्वकाही नवीन होते. एक संपूर्ण रस्ता पुस्तकांच्या ढिगाऱ्याने भरलेला होता. एका अगदी चिंचोळ्या गल्लीतून सहा जणांचे कुटुंब मोटरसायकलवरून जात असलेले पाहिले. पालरने आपल्या लेखात दिल्लीतील प्रसिद्ध चहाच्या दुकानाचे मालक ‘चाचा’ यांचादेखील उल्लेख केला आहे.

Paller-1(Courtesy: Shalev Paller)

भारतीयांच्या प्रेमळ स्वभावाचे त्याने खुप कौतुक केले आहे. ऋषिकेशमध्ये त्याची बस बिघडली असतानाचा प्रसंग कथन करताना तो म्हणतो, चालकाशी वाद न घालता सर्वजण रस्त्याच्या कडेला बसून राहिले. चहा बनवला, प्यायला आणि वाट पाहात राहिले. अनेक तास असेच निघून गेले. सूर्यास्त झाला परंतु अनेक कुटुंब, मित्र आणि अनोळखी एकमेकांशी अशा पध्दतीने संवाद साधत होते जसे काही झालेलेच नाही. माझ्या देशात असे काही मी अनुभवले नव्हते. जेव्हा वेळेला फार महत्व दिले जात नाही, तेव्हा ती बाब खास होते. आणि असेच चालू राहिले. प्रत्येक ठिकाणी एक नवा चेहरा, एक नवी कहाणी. एका गल्लीच्या कोपऱ्यावर चप्पल शिवणाऱ्याच्या शेजारी मी बसलो होतो, जो त्याच्या आईने शिकवलेले गाणे गात होता. एका चित्रपटगृहात गेलो असता चित्रपटातील वडील आणि मुलीची भेट पाहून दोनशे प्रेक्षक ओरडायला लागल्याचे मी पाहिले. मला गरम जेवण आणि गरम हवामानाची सवय झाली.

Paller-Cobbler(Courtesy: Shalev Paller)

भारत भ्रमण करून आपल्या घरी परतलेल्या पालरने आपले अनुभव लिहिण्याचा निर्णय घेतला. लेखाच्या शेवटी तो लिहितो, घरी परतल्यावर सर्वांनी मला गळाभेट केली. कसे वाटले हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला. यावेळी माझ्याकडे मायेच्या उबेची, मित्रांची, सौंदर्याची, हास्याची, माणुसकीची आणि प्रेमाची खूप छायाचित्रे होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 7:33 pm

Web Title: shalev paller israel soldier describes his experience of india article goes viral
Next Stories
1 घरात शौचालय बांधा आणि रजनीकांतच्या ‘कबाली’चे तिकीट मोफत मिळवा!
2 मित्रांच्या व्यसनाला कंटाळून त्याने लढवली तारणहार शक्कल!
3 पाहा कशी होती जगातील पहिली जाहिरात
Just Now!
X