‘धर्म संगम’ संमेलनात शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, ‘हिंदू कुटुंबांनी दहा अपत्यांना जन्म दिला पाहिजे.’  हिंदुंना बहुसंख्य ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे, असा अजब सल्ला देतानाच, सर्व हिंदू एकवटल्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, असे मत बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.
हिंदूंनी जास्तीतजास्त मुले होऊ द्यावी अशी वक्तव्य गेल्या काही दिवसांत होत आहेत. याच मालिकेत आता शंकराचार्यांचाही समावेश झाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उन्‍नावचे खासदार साक्षी महाराज यांना भाजपने मंगळवारी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म देण्याचा वादग्रस्त सल्ला साक्षी महाराजांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरून साक्षी महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
घर वापसीच्या मुद्द्यावर बोलताना शंकराचार्य सरस्वती म्हणाले, की हिंदू धर्मातूनच शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पुन्हा आपल्या मुळ धर्मात परतण्याचा अधिकार आहे. घर वापसीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणले नाही पाहिजेत. धर्मांतराविरोधात कायदा होऊ नये.