उत्कंठावर्धक घडामोडींनी भरलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे माजी नेते शंकरसिंह वाघेला यांनी गुरूवारी काँग्रेस आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीत हस्तक्षेप करायला नव्हता पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेस पक्षाने राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी कट आखल्याचा आरोपही त्यांनी केला.

गेल्याच महिन्यात शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले होते. यापैकी काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कसोटीची ठरली. मात्र, मोक्याच्या क्षणी काँग्रेसच्या दोन फुटीर आमदारांची मते बाद ठरल्याने पटेल यांचा विजय सुकर झाला होता. मात्र, काँग्रेसने हे सर्व पूर्वनियोजित कटाप्रमाणे घडवून आणल्याचा आरोप शंकरसिंह वाघेला यांनी केला. अहमद पटेल यांच्या विजयासाठी दोन फुटीर आमदारांची मते बाद ठरवायची, ही रणनीती काँग्रेसने आधीच आखली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलेला हस्तक्षेप अयोग्य होता. दोन पक्षांमध्ये वाद उदभवल्यास राज्यसभेच्या निवडणूक अधिकाऱ्याला अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार असतो, असे वाघेला यांनी म्हटले.

संकल्प, सिद्धी आणि नियती

राज्यसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस जिंकू शकणार नाही, असा दावा छातीठोकपणे केला होता. मी सीबीआय कारवाईच्या भीतीने पक्षाचा राजीनामा दिल्याचे गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी म्हटले होते. या वक्तव्यासाठी ते माफी मागणार नाहीत, तोपर्यंत मी काँग्रेसला मत देणार नाही, हे मी तेव्हाच स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच वाघेला यांच्या संपत्तीवर ईडी आणि सीबीआयने छापे टाकले होते. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी हे वक्तव्य केले होते. सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत वाघेला समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे अहमद पटेल यांचा पराभव होणार, असे म्हटले जात होते. मात्र, ऐनवेळी यापैकी दोन आमदारांची मते बाद ठरल्याने अहमद पटेल यांनी भाजपच्या बलवंतसिंह राजपूत यांच्यावर सहा मतांनी विजय मिळवला.

अहमद पटेल यांचा शहांना शह!